वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाची महासाथ बहुतांशी नियंत्रणात आली असली तरी या विषाणूचे नवनवीन उपप्रकार समोर येत आहेत. सध्या अमेरिका, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या बीए. २.८६ किंवा पिरोला या व्हेरियंटचा प्रसार होऊ लागला आहे. डॉक्टरांनी या प्रकारापासून सावधानतेचा इशारा दिला आहे.
पिरोला व्हेरियंट ओमिक्रॉनशी बराचसा मिळताजुळता आहे. ओमिक्रॉनच्या एक्सबीबी प्रकारापासूनच पिरोला आणि इरिस हे उपप्रकार तयार झाले आहेत, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. पिरोला आणि इरिस या दोन्ही प्रकारांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सावधगिरीचा इशारा दिला असून नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन केले आहे.
पिरोलाच्या नेमक्या प्रभावाबद्दल शास्त्रज्ञांना अद्याप पुरेशी कल्पना मिळालेली नाही. जगभरात पिरोलाचे केवळ ९ नमुने सापडले आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास करण्यास अडचणी येत आहेत. यापूर्वी कोरोना हेऊन गेलेल्या किंवा कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना पिरोलाचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे. सध्या अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पिरोलाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसत असला तरी इस्रायल, दक्षिण आफ्रिका आणि डेन्मार्क येथेही त्याचा संसर्ग दिसून आला आहे. २४ जुलै २०२३ रोजी पिरोलाचा प्रथम संसर्ग लक्षात आला आणि त्यानंतर त्याचा बराच वेगाने प्रसार होत आहे.
पिरोला आणि इरिस य दोन्ही उपप्रकारांचा प्रसार खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडलेल्या शरीरातील द्रवाच्या सूक्ष्म तुषारांमधून प्रसार होतो. अंगावर पुरळ उठणे, डोळे येणे, हगवण ही पिरोलाच्या लागणीची लक्षणे आहेत. तर ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा, स्नायूदुखी, डोकेदुखी, चव आणि वास घेण्यास अडथळा येणे, घसा खवखवणे ही इरिसची लक्षणे आहेत.
कोरोनाच्या पिरोला आणि इरिस या दोन्ही उपप्रकारांचा शास्त्रज्ञ अधिक अभ्यास करत असून त्यांच्यावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.