श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईला आल्यानंतर देशभरात राजपक्षे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात येण्यास राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी आणि आंदोलकांनी केला असून राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी शुक्रवारपासून देशात आणीबाणी लागू केली आहे.

श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवंलूबन आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात पर्यटन बंद असल्याने अर्थव्यवस्था संकटात आली होती. श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज फेडण्यासाठी ७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गरज आहे. मात्र, सध्या श्रीलंकेकडे १ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकेच परकीय चलन आहे. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे, पंतप्रधान महिंदा राजपक्षे, संरक्षण मंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद राजपक्षे कुटुंबाकडे असल्याने आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी कॅबिनेट बैठक घेऊन शुक्रवारपासून आणीबाणी लागू केली आहे. श्रीलंकेला १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. चीनने श्रीलंकेला मदतीचे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण केले नव्हते.

श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यापूर्वी राजपक्षे यांनी जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. राजपक्षे यांनी ट्विट करत आवाहन केले आहे की, ‘श्रीलंकेत भावनांचा उद्रेक वाढत असल्याने मी सर्वसामान्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करतो. लक्षात ठेवा की हिंसाचाराने फक्त हिंसाचार पसरेल. आर्थिक संकट दूर करण्यासाठी ठोस समाधानाची गरज आहे. ज्याचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध आहे.’

७६ वर्षीय महिंदा राजपक्षे यांच्यावर त्यांच्या स्वत:च्या श्रीलंका पोदुजाना पेरामुना पक्षाकडून पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव होता. मात्र, त्यांनी आपल्या समर्थकांना एकत्र करत हा दबाव झुगारला होता. अखेर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

श्रीलंकेतील अर्थव्यवस्था गेल्या काही महिन्यात रसातळाला गेली आहे. श्रीलंकेत तेल, विजेसह खाण्यापिण्याची टंचाई भासत आहे. औषधांचा तुटवडा जाणवत असून इतर देशांकडे मदतीसाठी श्रीलंकेने हात पसरले आहेत. कोरोना संकटामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारविरोधात सरकारचा रोष वाढला असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in