
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र १४ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर १५ मे रोजी राजीव कुमार नवीन मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारतील. राजीव कुमार यांचा कार्यकाळ १५ मे २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत असेल. घटनेनुसार निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ ६ वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षापर्यंत असतो.
राजीव कुमार हे १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. कुमार यांनी १ सप्टेंबर २०२० रोजी भारतीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. निवडणूक आयोगात पदभार स्वीकारण्यापूर्वी कुमार सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे अध्यक्ष होते. एप्रिल २०२० मध्ये ते पीईएसबीचे अध्यक्ष झाले. त्यांना केंद्रीय आणि राज्य मंत्रालयांमध्ये सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वने, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रात सरकारसाठी काम करण्याचा ३७ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे.