
लंडन : भारतात मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या एल निनोने आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. १९ च्या शतकात तापमानाची नोंद घेण्यास सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच पृथ्वीचे सरासरी तापमान १७ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. ३ जुलै रोजी ही तापमान नोंद करण्यात आली आहे. येणारे संपूर्ण वर्षभर एल निनो प्रभाव राहणार असल्याने येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच भूपृष्ठ आणि समुद्राचे तापमान वाढत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी केले आहे. जेथे कधीच उच्च तापमान पाहिले जात नाही, अशा उत्तर समुद्रात यावर्षी उष्णतेची लाट पाहिली गेली. शिवाय स्पेनसह अनेक आशियायी देशांमध्येदेखील उच्च तापमानाची नोंद केली गेली आहे. या आठवड्यात चीनच्या काही भागात ३५ अंशापेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागातही हीच स्थिती पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट प्रेडिक्शनने जागतिक सरासरी तापमान १७.०१ सेल्सिअस नोंदवले आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१६ मध्ये १६.९२ अंश सेल्सिअस इतके विक्रमी सरासरी तापमान नोंदवले गेले होते. ३ जुलैला नोंदवले गेलेले सरासरी तापमान हे १९७९ पासून सुरू झालेल्या सॅटेलाइट निरीक्षण यंत्रणेने नोंदवलेले सर्वाधिक तापमान होते. तज्ज्ञांनी असाही दावा केला आहे की, १९ व्या शतकात तापमानांच्या नोंदी घेण्यासाठी काही साधनांचा वापर झाला, तेव्हापासूनचे हे सर्वाधिक तापमान आहे.
संशोधकांच्या मतानुसार, तापमानातील ही नवी वाढ एल निनो परिणाम आणि मानव निर्मित कार्बन उत्सर्जनाला एकत्रित परिणाम आहे. एल निनोचे दक्षिण दोलन हा हवामानाच्या व्यवस्थेतील पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली प्रभाव आहे. तो थंड, गरम आणि सामान्य अशा तिन्ही अवस्था निर्माण करतो. जूनमध्येच संशोधकांनी यावर्षी एल निनो प्रभाव हवामानावर परिणाम करेल, असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे हा प्रभाव आता प्रशांत महासागराचे तापमान वाढवताना दिसत आहे. परिणामी जगाचे सरासरी तापमान वाढत आहे. हवामान संशोधक लिऑन सायमन म्हणाले, ‘‘एन निनोचा प्रभाव वाढायला आता सुरुवात झाली आहे. पुढच्या दीड वर्षात आपल्याला तापमानवाढीचे अनेक विक्रम पहायला मिळतील.’’
जुलै ठरणार १.२० लाख वर्षांतील सर्वात उष्ण महिना
१८५० ते १९०० या कालावधीत जगाचे सरासरी तापमान १.४६ डिग्री सेल्सिअसने अधिक होते. या तापमानवाढीचा परिणाम अंटार्क्टिकावरही होताना दिसत आहे. युक्रेनच्या वेर्नादस्की रिसर्च केंद्रात यावर्षी अंटार्क्टिकातील सर्वाधिक ८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली गेली. एल निनोचा प्रभाव जसजसा वाढत जाईल, तसतसे उत्तर ध्रुवावरील तापमानात आणखी वाढ दिसून येईल. लिपझीग विद्यापीठातील संशोधक कर्स्टन हॉस्टेन यांना तर वेगळीच भीती वाटते आहे. जुलै महिना या पृथ्वीच्या १ लाख २० वर्षांतील सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवला जाण्याची शक्यता हॉस्टेन यांनी व्यक्त केली आहे.