विश्वासाचे नाते

विश्वासाचे नाते

क्वाड परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी टोकियोमध्ये संवाद साधला. या दोन्ही नेत्यांनी, उभय देशातील संबंध आणखी दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. भारत आणि अमेरिकेने मिळून करण्यासारखे अनेक विषय आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातील भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असेही अमेरिकन अध्यक्षांनी म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर भारताने, अमेरिका आणि नाटो राष्ट्रांप्रमाणे भूमिका घ्यावी, असे त्या राष्ट्रांना वाटत होते; पण भारताने त्या राष्ट्रांना हवी म्हणून तशी भूमिका घेतली नाही. असे असतानाही अमेरिकेने जागतिक राजकारणामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे लक्षात घेऊन भारत आणि अमेरिकेमध्ये ‘विश्वासाचे नाते’ असल्याचे स्पष्ट केले. या दोन नेत्यांमध्ये जी चर्चा झाली, त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, असे भारतीय परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. या चर्चेच्या दरम्यान ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ कार्यक्रमांच्या अंतर्गत अमेरिकी कंपन्यांनी संरक्षण क्षेत्रात भारतासमवेत भागीदारी करावी आणि भारतात उत्पादने तयार करावीत, असे आवाहन या चर्चेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर भर दिला. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची जी क्वाड परिषद झाली, त्या परिषदेदरम्यान मोदी आणि बायडेन यांच्यामध्ये उभयपक्षीय चर्चा झाली. क्वाड परिषदेत बोलतानाही अमेरिका अध्यक्ष बायडेन यांनी, कोविड महामारीवर भारताने लोकशाही मार्गाने यशस्वी मात केल्याबद्दल भारताचे कौतुक केले. जे चीनला जमले नाही ते भारताने करून दाखविले, असे बायडेन यांनी आपल्या भाषणात सांगितले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये चीनकडून जी विस्तारवादी भूमिका घेऊन आक्रमक कृती केली जात आहे त्यास रोखण्यासाठी क्वाड परिषदेचे प्रामुख्याने आयोजन करण्यात आले होते. चीनकडून पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रात जी घुसखोरी केली जात आहे, त्याची या परिषदेत गंभीर दखल घेण्यात आली; मात्र ज्या चीनच्या आक्रमक भूमिकेला अटकाव करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्या चीनकडून या परिषदेची किती गंभीरपणे दखल घेतली जाईल याबद्दल शंकाच आहे. ही परिषद सुरू असतानाच चीन आणि रशियाच्या लढाऊ विमानांनी जपानजवळ सराव केला. जपानच्या हवाईहद्दीचा भंग जरी या सरावादरम्यान झाला नसला तरी इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर आमचेच वर्चस्व असल्याचे चीनने रशियाच्या सहकार्याने दाखवून दिले. क्वाडची ही दुसरी परिषद होती. त्या परिषदेत चारही देशांच्या नेत्यांनी दहशतवाद आणि सर्व प्रकारच्या हिंसक कारवायांचा आम्ही निषेध करीत असल्याचे स्पष्ट केले. २६/११चा मुंबईवर झालेला हल्ला, पठाणकोट हवाईतळावर झालेला हल्ला यासह सर्व दहशतवादी हल्ल्यांचा आम्ही पुन्हा निषेध करतो, असे या चारही नेत्यांनी म्हटले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचा प्रभाव कमी करण्याच्या हेतूने या क्षेत्रातील पायभूत सुविधांच्या विकासासाठी क्वाड परिषदेने ५० अब्ज डॉलरचा निधी देण्याची घोषणा केली आहे. क्वाड राष्ट्रांच्या या विधायक उपक्रमामुळे भल्यासाठी कार्य करणारी शक्ती म्हणून या गटाची प्रतिमा उंचावली जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे अन्नधान्य आणि इंधन यांचे दर भडकले आहेत. हे दर कशाप्रकारे नियंत्रणात ठेवता येतील या बाबतच्या उपाययोजनांवर अमेरिका अध्यक्ष आणि भारतीय पंतप्रधानांनी चर्चा केली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये युक्रेनसारखा संघर्ष निर्माण होता कामा नये, हे लक्षात घेऊन चार प्रमुख देशांचे नेते क्वाड परिषदेच्या निमित्ताने एकत्र आले होते. भारतीय पंतप्रधानांनी यावेळी जो बायडेन आणि अन्य नेत्यांशीही संवाद साधला. भारतासमवेत चांगले संबंध राखणे किती महत्त्वाचे आहे हे जो बायडेन यांनी जे वक्तव्य केले त्यावरून दिसून आले आहे. युक्रेनसंदर्भातील भारताची भूमिका लक्षात घेऊनही भारतसमवेत आमचे ‘विश्वासाचे नाते’ आहे, असे बायडेन यांनी म्हणणे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा प्रभाव वाढत असल्याचे द्योतक आहे. चीनला टक्कर द्यायची असेल तर भारतास वगळून चालणार नाही, हे अमेरिका आणि अन्य देशांच्या लक्षात आले आहे. भारत एक शक्ती म्हणून उभा राहिला आहे हे ओळखून भारत या परिषदेसंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी ओळखले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in