हमासकडून ओलीस ठेवलेल्या अमेरिकी माय-लेकीची सुटका

या दोघींच्या सुटकेनंतर हमासकडून आणखी लोकांची सुटका होईल
हमासकडून ओलीस ठेवलेल्या अमेरिकी माय-लेकीची सुटका

तेल अवीव : इस्रायलवरील हल्ल्यावेळी ओलीस ठेवलेल्यांपैकी दोघा अमेरिकन माय-लेकीची हमासने शुक्रवारी रात्री उशिरा सुटका केली. ज्युडिथ (५९) आणि नताली रानान (१७) या मूळच्या इस्रायली पण अमेरिकेतील शिकागो येथे वास्तव्यास असलेल्या माय-लेकीची हमासने सुटका केली आहे. ७ ऑक्टोबरपासून गाझामध्ये २०० हून अधिक नागरिकांना हमासने ओलीस ठेवले आहे.

सुटकेनंतर इस्रायली मीडियाला दिलेल्या मुलाखतीत, नतालीचे वडील उरी रानान म्हणाले की, त्यांची मुलगी ठीक आहे. हमासने तिला कोणताही त्रास दिलेला नाही. ती घरी परत आल्याचा आम्हा कुटुंबीयांना आनंद आहे.’’ ज्युडिथ आणि नताली रानान या दीड महिन्यांपूर्वी नहल ओझच्या दक्षिणेकडील किबुत्झमध्ये ज्युडिथची आई तामार लेविटान यांचा ८५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी इस्रायलमध्ये आल्या होत्या. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी किबुत्झवर हमासने हल्ला केला. त्यावेळी या दोघींना हमासने ओलीस ठेवले. या दोघींच्या सुटकेनंतर हमासकडून आणखी लोकांची सुटका होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

ज्युडिथ आणि नताली यांची सुटका करून हमास मानवतावादी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हे हमासचे ढोंग आहे. हमासने लहान मुले, स्त्रिया आणि वृद्धांना कैद केले आहे. ते क्रूर आहेत. त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही,’’ असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in