
चंद्राचे आकर्षण मानवाला कायमच आहे. चंद्रावर स्वारी केल्यानंतर तेथे आपल्याला वसता येईल का, असा विचार त्याच्या मनात आला. पण, ऑक्सीजन, पाण्याचे काय करणार? पण आता शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगाला मोठे यश मिळाले आहे. चंद्रावरून आणलेल्या मातीतून रोपे उगवल्याने शास्त्रज्ञांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावरून आणलेल्या मातीतून रोपे उगवली आहेत. ही माती नासाच्या अपोलो मिशनवर गेलेल्या
अंतराळवीरांनी पृथ्वीवर आणली होती.
कम्युनिकेशन्स बायॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित या संशोधनात म्हटले आहे की, अंतराळातून आणलेल्या मातीतूनही रोपे उगवू शकतात. चंद्रावरील मातीतून उगवलेल्या रोपांची जैविक प्रतिक्रिया तपासण्यात आली. चंद्रावर भोजन व ऑक्सीजनसाठी शेती करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.
फ्लोरिडा विद्यापीठाच्या प्रा. एना लिसा पॉल यांनी सांगितले की, यापूर्वीही चंद्राच्या मातीत रोपे उगवण्याचा प्रयोग केला होता. त्यावेळी या रोपांवर केवळ चंद्रावरील माती थोडी टाकली होती. आता चंद्रावरील मातीतून पूर्ण रोपेच उगवली आहेत.
१२ ग्रॅम मातीतून उगवली रोपे
शास्त्रज्ञांनी रोपे उगावायला ४ प्लेटस्चा वापर केला. पाण्यात काही पोषक मूल्ये टाकली ती चंद्रावरील मातीत मिळत नाहीत. त्यानंतर त्यात आर्बिडोप्सीस रोपांचे बी टाकले. काही दिवसांत बीजातून रोपे उगवली. अपोलो मिशनच्या सहा अंतराळवीरांनी ३८२ किलो दगड चंद्रावरून आणले होते. तीन वेळा प्रयत्न करून या दगडातून केवळ १२ ग्रॅम माती मिळाली. या मातीतून ही रोपे उगवली आहेत.