Father's Day 2024: २१ वर्षीय मुलीने आपले यकृत दान करत स्‍वत:च्‍या वडिलांना दिले नवीन जीवनदान!

Inspirational Medical Stories: फादर्स डेला मुले, विशेषत: मुली आपल्‍या वडिलांना शर्ट्स, पर्फ्यूम्‍स किंवा घड्याळ यांसारख्‍या भेटवस्‍तू देतात. पण श्रुती परदेशीने आपल्‍या वडिलांना भेट म्‍हणून आरोग्‍यदायी जीवन दिले.
Father's Day 2024: २१ वर्षीय मुलीने आपले यकृत दान करत स्‍वत:च्‍या वडिलांना दिले नवीन जीवनदान!

फादर्स डेला मुले, विशेषत: मुली आपल्‍या वडिलांना शर्ट्स, पर्फ्यूम्‍स किंवा घड्याळ यांसारख्‍या भेटवस्‍तू देतात. पण श्रुती परदेशीने आपल्‍या वडिलांना भेट म्‍हणून आरोग्‍यदायी जीवन दिले. या २१ वर्षीय मुलीने तिच्‍या वडिलांसाठी यकृत दान केले. फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथील डिपार्टमेंट ऑफ लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लाण्‍ट अँड एचपीबी सर्जरीचे संचालक डॉ. गौरव गुप्‍ता आणि त्‍यांच्‍या टीमने यशस्‍वीरित्‍या प्रत्‍यारोपण केले.

नाशिकमधील रूग्‍ण जितेंद्र परदेशी (वय ४५ वर्ष) तीन वर्षांपासून क्रोनिक लिव्‍हर डीसीज, हेपाटिक एन्‍सेफॅलोपॅथी (यकृताशी संबंधित ब्रेन डायस्‍फंक्‍शन), असाइटीस आणि मूत्रपिंड बिघाडाने पीडित होते. गेल्‍या वर्षी, त्‍यांची तब्‍येत अधिक खालावली, जेथे त्‍यांना कावीळ, रक्‍ताच्‍या उलट्या झाल्‍या, तसेच बल्‍ड थिनिंगमुळे (रक्‍त पातळ होणे) स्‍ट्रोक देखील आला.

त्‍यांच्‍या कुटुंबियांना, विशेषत: त्‍यांच्‍या मुलीला त्‍यांची अशी अवस्‍था पाहणे सहन होत नव्‍हते. वडिलांना लवकर बरे करण्‍याचा निर्धार करत श्रुतीने कुटुंबियांना व वडिलांना मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्‍ये आणले. त्‍यांची गंभीर स्थिती आणि उपलब्‍ध उपचार पर्याय समजल्‍यानंतर श्रुतीने स्‍वेच्‍छेने तिचे यकृत दान करण्‍याचे ठरवले. पण, शस्‍त्रक्रियेपूर्वी तपासणी करताना तिची शरीररचना वेगळी असल्‍याचे निदर्शनास आले. सामान्‍यत: यकृताच्‍या उजव्‍या व डाव्‍या बाजूंना होणारा रक्‍तपुरवठा वेगवेगळा असतो, पण श्रुतीच्‍या बाबतीत तिच्‍या यकृताच्‍या डाव्‍या बाजूला उजव्‍या बाजूकडील रक्‍तवाहिन्‍यांमधून अंशत: रक्‍तपुरवठा होत होता. याचा अर्थ असा की प्रत्‍यारोपणासाठी तिच्‍या यकृताच्‍या उजव्‍या बाजूचा उपयोग केल्‍यास यकृताच्‍या डाव्‍या बाजूवर परिणाम होऊ शकतो. यामुळे, फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी प्रत्‍यारोपणासाठी तिच्‍या यकृताच्‍या उजव्‍या बाजूचा (राइट पोस्‍टेरिअर सेक्‍टर ग्राफ्ट) फक्‍त अर्धा भाग वापरण्‍याचे ठरवले.

मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्‍या डिपार्टमेंट ऑफ लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लाण्‍ट अँड एचपीबी सर्जरीचे संचालक डॉ. गौरव गुप्‍ता म्‍हणाले, “आम्‍हाला या केसमध्‍ये दोन आव्‍हानांचा सामना करावा लागला. पहिले म्‍हणजे, मुलीची अद्वितीय शरीररचना, ज्‍यामुळे आम्‍ही राइट पोस्‍टेरिअर सेगमेंट ग्राफ्ट प्रक्रिया केली, जी क्‍वचितच केली जाते. या प्रकारच्‍या दात्‍याच्‍या शस्‍त्रक्रियेमध्‍ये यकृताच्‍या उजव्‍या बाजूचा भाग (यकृताचा ६० ते ६५ टक्‍के भाग) घेण्‍याऐवजी आम्‍ही यकृताच्‍या उजव्‍या बाजूचा अर्धा भाग (यकृताच्‍या जवळपास ३० ते ३५ टक्‍के) घेतो. यामुळे दात्‍याची शस्‍त्रक्रिया आव्‍हानात्‍मक असते. दुसरे आव्‍हान म्‍हणजे, प्राप्‍तकर्ता रूग्णाने अशा लहान यकृताला प्रतिसाद देणे, ज्‍यामुळे गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. सामान्‍यत:, प्राप्‍तकर्ता रूग्‍णाला जगण्‍यासाठी जवळपास ५०० ते ६०० ग्रॅम वजनाच्‍या यकृताची गरज असते. या केसमध्‍ये आम्‍ही रूग्‍णाला फक्‍त ३७० ग्रॅम वजनाचे यकृत देऊ शकलो, जे वजनाने खूप कमी होते. पण, आम्‍ही आव्‍हानांवर मात केली आणि शस्‍त्रक्रिया यशस्‍वी ठरली.

शस्‍त्रक्रियेनंतर रूग्‍ण आणि अवयवदाता नाशिकला परतले आहेत आणि त्‍यांची प्रकृती चांगली आहे. इंजीनिअर आणि आयटी कंपनीची मालक असलेल्‍या श्रुती आपले मत व्‍यक्‍त करत म्‍हणाल्‍या, “माझ्या वडिलांना वारंवार आजारी पडताना पाहून खूप वाईट वाटायचे आणि मला माहित होते की त्‍यांना बरे होण्‍यासाठी कायमस्‍वरूपी उपचाराची गरज आहे. आम्‍हाला प्रत्‍यारोपणाबाबत सांगण्‍यात आले तेव्‍हा मी त्‍वरित माझे यकृत देण्‍याचे ठरवले, कारण मला माझ्या वडिलांना आरोग्‍यदायी पाहायचे होते. शस्‍त्रक्रिया झाल्‍यापासून ते सक्रिय असून उत्‍साहाने जीवन जगत आहेत. आम्‍ही फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड आणि वैद्यकीय टीमचे आभार मानतो, ज्‍यांनी माझ्या अद्वितीय लिव्‍हर अ‍ॅनोटॉमीसाठी उपाय शोधून काढला आणि मला माझ्या वडिलांना नवीन जीवनदान देण्‍यास मदत केली.''

प्राप्‍तकर्ता रूग्‍ण आणि अवयवदाता या दोघांची प्रकृती चांगली आहे. सावधगिरीचे उपाय म्‍हणून जितेंद्र यांना आवश्‍यक औषधोपचार घेण्‍याचा आणि आरोग्‍यदायी जीवनशैलीचे पालन करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला आहे. १६ जून रोजी साजरा केल्‍या जाणाऱ्या फादर्स डेला वडिल-मुलीची जोडी प्रत्‍यारोपणानंतरच्‍या सात आठवड्यांना साजरा करणार आहेत आणि त्‍याबाबत तयारी उत्‍साहात सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in