Rose Day :फक्त प्रेमाचे प्रतीक नाही तर आरोग्यालाही फायदेशीर आहे गुलाब, जाणून घ्या सविस्तर!

गुलाब म्हटले की मनात सर्वात पहिल्यांदा फक्त प्रेम हीच भावना जागृत होते. विशेषतः लाल गुलाबाला प्रेमाचे प्रतीक म्हणून मानले जाते.
Rose Day :फक्त  प्रेमाचे प्रतीक नाही तर आरोग्यालाही  फायदेशीर आहे गुलाब, जाणून घ्या सविस्तर!
PM

गुलाब म्हटले की मनात सर्वात पहिल्यांदा फक्त प्रेम हीच भावना जागृत होते. विशेषतः लाल गुलाबाला प्रेमाचे प्रतीक म्हणून मानले जाते. फेब्रुवारी या प्रेमाच्या महिन्यात आज (७ फेब्रुवारी) रोजी रोझ डे साजरा करण्यात येतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील प्रेमाच्या भावना सांगण्यासाठी आपण वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाचा उपयोग करत असतो. पण तत्पूर्वी गुलाब जे प्रेमाचे प्रतीक आहे तेच गुलाब आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर ठरते हे तुम्हाला माहीत आहे का? गुलाबामुळे नक्की कसा फायदा मिळतो हे आता जाणून घ्या.

वजन कमी करण्यासाठी फायदा-

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये असणारे पोषक तत्व हे शरीरातील साचलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात आणि त्यामुळे पचनक्रिया अधिक सुरळीत होण्यास मदत मिळते. चयापचय क्रिया सुरळीत झाल्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास सुरूवात होते. तुम्हाला जर सतत भूक लागत असेल तर गुलाबाच्या पाकळ्यांचे सेवन करावे. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. आपल्या आहारामध्ये तुम्ही सकाळी गुलकंदाचाही समावेश करून घेऊ शकता. १ चमचा गुलकंद नियमित खाल्ल्याने फायदा मिळतो.

तणाव होतो दूर-

सतत कामाचा व्याप, घरातील कटकट अथवा बाहेरचा त्रास या सगळ्यामुळे हल्ली लवकर थकवा आणि नैराश्य, चिंता यासारख्या आजारांनाही सामोरे जावे लागते. तणावामुळे झोप पूर्ण न होणे आणि मनाला - शरीराला शांतता न मिळणे सर्रास दिसून येत आहे. यासाठी तुम्ही झोपताना आपल्या बेडवर काही गुलाबाच्या पाकळ्या पसरवा. ज्याच्या सुगंधामुळे मन शांत होऊन ताणतणाव दूर होण्यास फायदा मिळतो. आठवड्यातून किमान १-२ दिवस असे नक्की करून पाहा.

मूळव्याधावर उपयुक्त-

मूळव्याधाचा त्रास हा खूपच त्रासदायक ठरतो. अन्नपचन न होणे, वेळेवर न जेवणे या सगळ्यामुळे शौचाची समस्या वाढत जाऊन मूळव्याधाचा त्रास निर्माण होतो. ज्या व्यक्तींना मूळव्याधाची समस्या आहे, त्यांनी नियमित गुलाबाच्या पाकळ्या सेवन कराव्या. गुलाबामध्ये असणारे फायबर आणि त्यातील पाणी हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून पचनक्रिया उत्तम करते. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास कमी होऊन शौचामार्ग निघणारा रक्तस्राव आणि दुखणेही कमी होते.

हाडांना मिळते मजबूती-

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचे जबरदस्त प्रमाण असते. हाडे मजबूत करण्यासाठी गुलाबा्चा उपयोग करून घेता येतो. गुलाबाच्या पाकळ्याचा तयार करण्यात आलेला गुलकंद तुम्ही नियमित रोज सकाळी १ लहान चमचा सेवन करून शकता. आपल्या लहान मुलांनाही हा खायला द्यावा, जेणेकरून हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.

मधुमेह आणि कर्करोग रोखण्यासाठी-

गुलाबामधील अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी फायदेशीर ठऱतात. तसंच गुलाबाच्या चहामध्ये पॉलिफेनॉल हे अँटीऑक्सिडंट असून कर्करोग, टाइप २ डायबिटीस, हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. १२ प्रकारच्या गुलाबांमध्ये असणारे फिनॉलचे प्रमाण हे अत्यंत समृद्ध असून कर्करोगविरोधी, दाहकविरोधी वेदनाशमन करण्यासाठी उपयुक्त असल्याचे अभ्यासात सिद्ध झाले आहे.

मासिक पाळीच्या वेदनांसाठी-

मासिक पाळीमध्ये असह्य वेदना होत असतात. या वेदना ५०% पेक्षा अधिक मुलींना वा महिलांना त्रासदायक ठरतात. मासिक पाळीच्या काळात अनेकांना थकवा, पाठदुखी, कंबरदुखी, उलट्या होणे,चक्कर येणे अथवा जुलाब होणेसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे अशावेळी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा गुलकंद नियमित खावा अथवा गुलाबाच्या पानांपासून वा पाकळ्यांपासून बनवलेला चहा प्यावा. जेणेकरून वेदना कमी होतील.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in