
कराड : तालुक्यातील १६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण सरपंच पदासाठी ५३ आणि ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी ३२३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पाटण तालुक्यात २६ सार्वत्रिक व २४ गावच्या पोटनिवडणुका होत असून २६ गावांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आवश्यक सरपंच व सदस्यांसाठी अधिकृत उमेदवार मिळाले. पोट निवडणुकात २४ पैकी ८ गावातच उमेदवार मिळाल्याने १६ गावांची पदे रिक्त राहिलेली आहेत. या निवडणुकांत सार्वत्रिकसाठी सरपंच पदासाठी ९८,सदस्य ५२० व पोट निवडणुका १५ असे एकूण ६३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने कराड व पाटणच्या प्रशासकीय इमारत परिसरात मोठी गर्दी झाली होती.
कराड तालुक्यातील टेंभू येथे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण असल्यामुळे तेथे अटीतटीची लढत पहावयास मिळणार आहे. सावरघर, यशवंतनगर, डिचोली या ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहेत. शेळकेवाडी (येवती) येथील सरपंचपद पदासाठी एकच अर्ज आला आहे. त्यामुळे ती जागा बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी करंजोशी सावरघर, यशवंतनगर, डिचोली या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर उर्वरित भोसलेवाडीत सरपंच पदासाठी तीन,सदस्य २१, बानुगडेवाडी सरपंच चार, सदस्य १४, गोसावेवाडी सरपंच दोन, सदस्य १२, हेळगाव सरपंच सहा, सदस्य १९, कांबीरवाडी सरपंच तीन, सदस्य १८, पिंपरी सरपंच दोन, सदस्य १०, शेळकेवाडी सरपंच एक, सदस्य १०, येणपे सरपंच तीन, सदस्य २९, येवती सरपंच तीन, सदस्य २४, रेठरे बुद्रुक सरपंच १५, सदस्य ९२, सयापूर सरपंच दोन, सदस्य पाच, टेंभू सरपंच पाच, सदस्य ३४ अर्ज दाखल झाले आहेत. आजअखेर सरपंच पदासाठी ५३, तर सदस्य पदासाठी ३२३ उमेदवारी अर्ज रविवार अखेर दाखल झाले.
५ नोव्हेंबरला मतदान
कराड व पाटण तालुक्यातील या निवडणुकीसाठी दाखल अर्जाची सोम.२३ रोजी सकाळी ११ वा. छाननी होणार आहे. २५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी व त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे.या निवडणुकीसाठी रवि. ५ नोव्हेंबरला मतदान आणि सोम. ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती कराड व पाटण तहसीलदारांनी दिली.