५ कोटी जप्त केले, पण १० कोटी रुपयांनी भरलेल्या मोटारीला सोडून दिले - संजय राऊत

पोलिसांनी ५ कोटींनी भरलेली एकच कार जप्त केली. परतु ३० ते ३५ कोटी रोकड घेऊन आणखी सहा कार निघाल्या होत्या, असा दावा राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही केला.
५ कोटी जप्त केले, पण १० कोटी रुपयांनी भरलेल्या मोटारीला सोडून दिले - संजय राऊत
(संग्रहित छायाचित्र, ANI)
Published on

मुंबई : नाकाबंदी दरम्यान मुंबई- बंगळुरू महामार्गावर पुणे पोलिसांनी सोमवारी एका मोटारीतून ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. मात्र आणखी १० कोटी रुपयांनी भरलेल्या दुसऱ्या मोटारीला सोडून देण्यात आल्याचा दावा करून महायुतीकडून निवडणुकीमध्ये पैशाचे वाटप करण्यात येत असल्याचे हे उदाहरण आहे, असा घणाघात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केला.

जप्त करण्यात आलेली ५ कोटी रुपयांचा संबंध शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याशी जोडत राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला. निवडणुकीच्या काळात अशा घटना होत असताना देशाचा निवडणूक आयोग मात्र डोळे बंद करून बसला असल्याची टीकाही राऊत यांनी केली.

सरकारचा सत्तेसाठीच कोटींचा खर्च - रोहित पवार

पोलिसांनी ५ कोटींनी भरलेली एकच कार जप्त केली. परतु ३० ते ३५ कोटी रोकड घेऊन आणखी सहा कार निघाल्या होत्या, असा दावा राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. महायुतीचा भ्रष्टाचार ५० ते ६० हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यातले ५ हजार कोटी सत्तेवर येण्यासाठी खर्च झाल्यास सरकारसाठी ही काही फार मोठी रक्कम नाही, असे पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in