
हरयाणाच्या राखीगढी येथे हडप्पाकालीन शहर सापडले आहे. जवळपास ७ हजार पूर्वीचे हे शहर असावे, असा कयास पुरातत्व संशोधकांनी व्यक्त केला आहे. या ठिकाणी सोन्याची फॅक्टरी सापडली आहे. तसेच सोने, मातीच्या बांगड्या व अन्य महत्वपूर्ण सामान मिळाले आहे.
हरयाणातील राखीगढी भागात काही घरांचे डिझाईन व स्वयंपाकघर सापडले आहेत. या शहराच्या खोदकामात तांबे व सोन्याचे दागिने सापडले आहेत. हे शहर म्हणजे हजारो वर्षांपूर्वी व्यापाराचे केंद्र असावे, असा संशोधकांचा कयास आहे. या भागातून ३८ मानवी सापळे सापडले असून त्यात दोन महिलांचे आहेत. त्यात बांगड्या, तांब्याचा आरसा, तुटलेली भांडी दिसून आली. यातील एका मानवी सापळ्याची डीएनए चाचणी केली आहे. त्यात ती महिला भारतीय असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच या महिला त्या काळात खास पदावर होत्या, असे दिसून आले.
चित्रलिपी वाचण्याचे प्रयत्न सुरू
काही भांडयांवर चित्रलिपी कोरली आहे. ती आतापर्यंत कोणीही वाचू शकलेले नाही. मात्र, लवकरच ती वाचण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. लिपी वाचल्यानंतर हडप्पाच्या सभ्य संस्कृतीतील अनेक बाबींचा खुलासा होऊ शकेल.
पर्यटकांना बघायला मिळणार
राखीगढी साईट खुली केली जाणार आहे. येथे सापडलेल्या वस्तू म्युझीयममध्ये ठेवल्या जातील. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे विशेष पथक राखीगढीला पोहचले आहेत. या भागात खोदाई सुरू राहणार आहे.
हस्तिनापूरच्या लोकांचे
पूर्वज होते राखीगढीचे लोक
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी डॉ. संजय मंजुळ म्हणाले की, गेली २० वर्षे हस्तिनापूर, सिनौली व राखीगढीत पुरातत्व विभागाने काम केले. राखीगढीचे लोक हे हस्तिनापूर वासीयांचे पूर्वज होते, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. ७ हजार वर्षांपूर्वी डिझायनर घरे बांधली जात होती, असे त्यांनी सांगितले.