गुटखाविक्री करण्यासाठी हप्ता मागणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर गुन्हा दाखल

गुटखाविक्री करण्यासाठी हप्ता मागणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर गुन्हा दाखल

पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखाविक्री करण्यासाठी महिन्याला २५ हजारांचा हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या दौलताबाद पोलीस ठाणाच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्यासह पोलीसनाईक रणजित सुखदेव शिरसाठ यांच्याविरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिला हप्ता स्वीकारताना पोलीसनाईक शिरसाठला औरंगाबाद लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन महिन्यांपूर्वी दौलताबाद पोलीस ठाण्यात बदली होऊन आलेल्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुटखाविक्री जोरात सुरू होती. पोलीस ठाणे हद्दीत गुटखाविक्री करणाऱ्याला मिसाळ यांनी २४ मार्च रोजी हवालदारामार्फत बोलावणे पाठवले. त्यानंतर गुटखाविक्री करण्यासाठी महिन्याला २५ हजाराचा हप्ता द्यावा लागेल, असे मिसाळ यांनी त्या विक्रेत्याला सांगितले; मात्र तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. तसेच पोलीसनाईक शिरसाठ यांनीही वेगळे दोन हजार देण्याची मागणी केली.

त्यानंतर गुटखाविक्रेत्याने थेट औरंगाबाद एसीबीचे कार्यालय गाठत तक्रार दिली. त्यानंतर गुरुवारी दुपारी १२ वाजता पोलीस ठाण्यातच पैसे देण्याचे ठरले आणि त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा लावला. यावेळी पोलीसनाईक रणजित शिरसाठ याने मिसाळ यांचे १० हजार आणि स्वतःचे दोन हजार रुपये स्वीकारले. एसीबीच्या पथकाने शिरसाठला रंगेहाथ पकडले. शहरातील महत्त्वाचे समजले जाणारे तसेच दौलताबाद पोलीस ठाण्यातील एका पोलीस ठाण्याच्या प्रमुख सुनीता मिसाळ यांच्यावर एसबीची कारवाई झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in