पाटण : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पाटण पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ललित पाटील प्रकरणात पालक मंत्री शंभूराज देसाई यांचे नाव घेतल्याच्या कारणावरून नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
सुषमा अंधारे यांनी पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि पालक मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. मात्र, शंभूराज देसाई यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले होते. सुषमा अंधारे यांचे वक्तव्य हास्यास्पद असून त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, शंभूराज देसार्इंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत रविवारी पाटणमधील नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारअर्ज दाखल केला. त्यानुसार पाटण पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्यावर भा.दं.वि. सं. कलम ५०० अन्वये अब्रुनुकसानीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.