लेखणीची बांधीलकी साहित्य, समाज आणि संस्कृती यांना बलशाली करण्यासाठी वापरावी राज्यस्तरीय गझल

सार्वत्रिक सुमारीकरणाच्या काळात स्वांतसुखाय पद्धतीने लिहिणे हे जाणिवा बोथट झाल्याचे लक्षण आहे.
लेखणीची बांधीलकी साहित्य, समाज आणि संस्कृती यांना बलशाली करण्यासाठी वापरावी 
राज्यस्तरीय गझल
Published on

छत्रपती संभाजीनगर : मानवी जीवनातील भावभावनांप्रमाणे समाज जीवनात निर्माण झालेल्या समकालीन प्रश्नांबाबत, व्यवस्थेबाबत, आव्हानांबाबत परखड व दिशादर्शक भाष्य करणे हे गझलकारांचे कर्तव्य आहे. आज गझलेची लोकप्रियता, कर्णप्रियता, हृदयप्रियता आणि नयनप्रियता अर्थात छापील गझल वाचन मोठ्या प्रमाणात वाढत आहे.कवी या शब्दाचा अर्थ द्रष्टा, नवा विचार देणारा, विचारवंत असा आहे. आपल्यावर असलेल्या सामाजिक जबाबदारीच्या उत्तरदायित्वाचे भान कलावंताला अर्थात गझलकाराला विसरता येणार नाही. सार्वत्रिक सुमारीकरणाच्या काळात स्वांतसुखाय पद्धतीने लिहिणे हे जाणिवा बोथट झाल्याचे लक्षण आहे. गझलकार हा तर अल्प अक्षरांमध्ये टोकदार विधाने करण्याला बांधील आहे. लेखणीची ही बांधीलकी साहित्य ,समाज आणि संस्कृती यांना बलशाली करण्यासाठी वापरणे ही गझलकारांसह सर्व साहित्यिकांवर काळाने टाकलेली जबाबदारी आहे. हे गझल संमेलन त्याबाबतचे भान देण्याचे काम करेल, असा मला विश्वास वाटतो, असे मत नामवंत गझलकार प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते रेणुका गझल मंच या संस्थेच्या राज्यस्तरीय पहिल्या गझल संमेलनाचे उद्घाटक या नात्याने बोलत होते. ज्येष्ठ गझलकारा प्रा. सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी प्रा.सुनंदा पाटील यांना ' गझल सरस्वती 'या किताबाने मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.या गझल संमेलनाचे आयोजन रेणुका गझल मंच प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. रे .भ. भारस्वाडकर यांनी केले होते, तर संयोजक ज्येष्ठ गझलकार व गांधी स्मारकचे ट्रस्टी डॉ. शेख इक्बाल मिन्ने हे होते. अंजली दीक्षित( पंडित) यांनी संमेलनाच्या समन्वयक म्हणून कार्य केले. प्रसाद कुलकर्णी यांनी उद्घाटक या नात्याने गझल विधेचा इतिहास ,वर्तमान ,भविष्य आणि गझलकारांची जबाबदारी याचे विस्तृत विवेचन केले.

या संमेलनात डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली 'मुशायरा झाला. त्यामध्ये डॉ. र. भा. भारसवाडकर , बापू दासरी, डॉ. लक्ष्मण शिवनेरकर, हर्षल आचरेकर,आत्माराम कदम, रमेश डफळ,प्रा. डॉ. अविनाश कासंडे, आत्माराम जाधव , गौतम सूर्यवंशी, डॉ. प्रशांत पाटोळे , अरुण कटारे, सुवर्णा मुळजकर, प्रा. डॉ. अविनाश कासंडे,आत्माराम जाधव , अनिकेत सागर, क्रांती वेंदे, आत्तम गेंदे,दीपक हापत, शेखर गिरी,गिरीश जोशी, संजय पवार, अनुराधा वायकोस, यशवंत मस्के, वृषभ कुलकर्णी, सोमनाथ सोनवणे, सुनिता कपाळे इत्यादी नामवंत गझलकारांनी आपल्या गझला सादर करून दाद मिळवली.

logo
marathi.freepressjournal.in