अवैध गर्भपातप्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडेला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर

अवैध गर्भपातप्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडेला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर

राज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपातप्रकरणी आरोपी असलेल्या डॉ. सुदाम मुंडेला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुदाम मुंडेला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

सुदाम मुंडेला औरंगाबाद खंडपीठाने जामीन देतेवेळी ५ वर्षांसाठी वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला होता. त्यानंतरही बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बोगस डॉक्टर शोध कमिटीने परळीतील रामनगर येथे ५ सप्टेंबर २०२० रोजी आरोपी मुंडेच्या दवाखान्यावर छापा टाकला होता.

त्यानंतर त्या ठिकाणी ४ रुग्ण उपचार घेताना आढळले. तसेच वैद्यकीय उपकरणे व साहित्य आढळून आले. सदर छाप्यावेळी सुदाम मुंडे यांनी सर्व पथकाला धमकी दिली व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले, असे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी फिर्याद दिली.

याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सुदाम मुंडेला २३ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय दंड विधान कलम ३५३ प्रमाणे ४ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंड कलम ३३ (२) मेडिकल व्यवसाय कायद्यान्वये ३ वर्षे शिक्षा आणि कलम १५ (२) इंडियन मेडीकल कौन्सिल कायद्यान्वये एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.

या निर्णयाविरोधात आरोपी सुदाम मुंडेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. सुदाम मुंडेच्या वकिलांनी प्रभावी युक्तिवाद करताना सदर प्रकरणात भा.दं.वि. ३५३ कलम लागू होणार नाही, असे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा बचाव ग्राह्य धरुन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी डॉ. सुदाम मुंडेचा जामीन अर्ज मंजूर केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in