
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत. त्यांच्या 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या लॉन्चिंग कार्यक्रमात त्यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केली. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी वायबी सेंटरबाहेर आंदोलक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले, “राजीनामा देण्यापूर्वी मी तुमच्याशी चर्चा केली असती, तर तुम्ही मला हो म्हटलं नसतं, याची मला खात्री आहे. या निर्णयावर उद्या राज्याबाहेरील लोकांची बैठक होणार आहे. त्यानंतर एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय देऊ. दोन दिवसांनी असे बसावे लागणार नाही" असे सूचक विधान शरद पवार यांनी केले आहे.
“मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राबाहेरील तुमचे अनेक सहकारी इथे आले आहेत. त्यांना उद्या माझ्याशी बोलायचे आहे. उद्या संध्याकाळी मी त्यांच्याशी भेट घेणार आहे. त्यानंतर तुमच्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन आणि बाह्य सहकार्यांवर विश्वास ठेवून... येत्या एक ते दोन दिवसांत आम्ही अंतिम भूमिका घेऊ. पण ती भूमिका घेताना कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, एवढेच मी येथे सांगत आहे. दोन दिवसांनी तुम्हाला असे बसावे लागणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.