
सध्या राज्यामध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. अशामध्ये आता राज्यासह देशातही कोरोनासंदर्भात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "हे सरकार कोरोनाबाबत गंभीर नाही. कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे? याची नेमकी माहिती द्या, अशी मागणी आम्ही सरकारला केली होती. पण या राज्य सरकारला कोरोनासंदर्भातील गांभीर्य दिसत नाही." अशी टीका त्यांनी केली आहे.
अजित पवार म्हणाले की, " सरकारी कार्यालये असोत किंवा सामान्य नागरिक, यांच्यासाठी मास्कसक्ती संदर्भात आदेश काढले पाहिजेत. पण मंत्री, शासकीय अधिकारीच मास्क वापरत नसल्यामुळे जनतेला गांभीर्य राहिलेले नाही." अशी टीका केली. ते पुढे म्हणाले की, "सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील कोरोनाची सध्याची वस्तू स्थिती जनतेला सांगावी. आणि त्यांना अयोध्येला जायचे आहे तर जाऊद्यात, पण राज्यात उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री उपलब्ध आहेत. त्यांनी कोरोनाची स्थिती सांगावी," असा टोला त्यांनी यावेळी लगावला.