अजितदादांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ; कोणाला पक्ष सोडून जायचे असेल तर कसे रोखणार -पवार

आता पवारांनी त्यांचाच निर्णय फिरवल्यामुळं अजित पवारांची राजकीय कोंडी झाली आहे. त्यामुळं आता अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ?
अजितदादांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ; कोणाला पक्ष सोडून जायचे असेल तर कसे रोखणार -पवार

शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते, मात्र अजित पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. अजितदादांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला. पत्रकार परिषदेला काही सगळेच नेते उपस्थित असण्याची आवश्यकता नसते असे उत्तर यावेळी शरद पवार यांनी दिले, मात्र त्याचवेळी कोणाला पक्ष सोडून जायचे असेल तर कसे रोखणार, हे त्यांनी केलेले वक्तव्य अनेक प्रश्न निर्माण करून जाणार आहे.

अजितदादा नाराज आहेत. अजितदादा भाजपमध्ये जाणार अशा प्रकारच्या अनेक वावड्या गेले काही दिवस उठत होत्या. स्वत: अजित पवार यांनी या सर्व अफवा आहेत. यात कोणतेही तथ्य नसल्याने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. मात्र या बातम्या शमण्याचे काही नाव घेत नाहीत. त्यातच शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि या बातम्यांच्या आगीत आणखीनच तेल ओतले गेले. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची एकमुखाने मागणी होती. मात्र पहिल्याच दिवशी जर नवीन पक्षाध्यक्ष येत असेल तर तो का नको, अशी भूमिका घेणारे एकमेव अजित पवारच होते. त्यामुळे या चर्चांनी आणखीनच जोर धरला.

अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांनी एक समिती नेमली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा त्यात समावेश होता. या समितीची बैठक शुक्रवारी सकाळी पार पडली. या बैठकीला अजित पवार हजर होते. त्यानंतर सिल्व्हर ओक येथे नेते गेले असताना देखील अजित पवार हजर होते, मात्र शरद पवार यांनी संध्याकाळी ज्यावेळी निर्णय मागे घेत असल्याची पत्रकार परिषद घेतली त्यावेळी मात्र अजित पवार हजर नव्हते. इतक्या महत्त्वाच्या घोषणेच्या वेळी अजितदादांची अनुपस्थिती ही निश्चितच खटकणारी होती. पत्रकारांनी देखील यावेळी शरद पवार यांनाच याबाबत प्रश्न केला तेव्हा शरद पवार म्हणाले, पत्रकार परिषदेच्या वेळी सर्वच नेत्यांनी उपस्थित असावे हे काही अपेक्षित नसते, मात्र यामुळे काही विचारणाऱ्यांच्या मनाचे समाधान झाले नाही.

मात्र अजितदादांच्या अनुपस्थितीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. राष्ट्रवादीतील एका महत्त्वाच्या मुद्यावर आता पडदा पडला असला, तरी येत्या काळात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची बिजे यात रोवली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजितदादा पुण्याला की दिल्लीला?

अजितदादांच्या कार्यालयाकडून दादा पुण्याला गेल्याचे सांगण्यात आले, मात्र ते दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. पक्षावरील वर्चस्व आणि भाजपसोबत युती करण्याच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शरद पवारांची मुंबईत पत्रकार परिषद सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवार मात्र दिल्लीसाठी रवाना झाल्याचे वृत्त आहे. पवारांच्या निर्णयामुळे अजित पवार नाराज असल्याचे समजते. अजित पवार यांच्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला तेव्हा अजित पवारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. परंतु आता पवारांनी त्यांचाच निर्णय फिरवल्यामुळं अजित पवारांची राजकीय कोंडी झाली आहे. त्यामुळं आता अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in