
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची दाभोळकर यांच्याप्रमाणे हत्या करण्याची ट्विटरद्वारे जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातील एका बड्या सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचार्याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सागर बर्वे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या दोन्ही प्रोफाईलवरुन प्रत्यक्षपणे शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून सतत शरद पवार यांची बदनामी करुन त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांशी भेट घेऊन अशा धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सक्त कारवाई करण्याची विनंती केली होती. दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही पोलीस आयुक्तांना तातडीने कारवाई करुन संबंधित दोषीवर अटकेची कारवाई करा, असा आदेश दिला होता. त्यामुळे एल. टी मार्ग पोलिसांत गुन्हा नोंद होताच त्याचा संमातर तपास गुन्हे शाखेने सुरू केला होता.
तपासात ही धमकी पुण्यातून आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने पुण्यातून सागर बर्वे याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. सागर हा मूळचा पुण्याचा रहिवाशी असून, एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. त्यानेच शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे उघडकीस येताच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.