उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटात प्रवेश ; मराठवाड्यात शिवसेनेला जबर झटका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जालन्याच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली
उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटात प्रवेश ; मराठवाड्यात शिवसेनेला जबर झटका

माजी मंत्री तथा जालन्याचे शिवसेनेचे मातब्बर नेते अर्जुन खोतकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर जड अंतकरणाने शनिवारी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात शिवसेनेला जबर झटका बसला असला तरी ते मनापासून शिंदे गटात गेले नसल्याचे स्पष्ट झाले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी व कुटुंबाला ‘सेफ’ करण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. हे त्यांनी खुल्या मनाने जाहीरही केले.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जालन्याच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. आज सकाळी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. माझ्यावर बेतलेल्या प्रसंगाची त्यांना माहिती दिली. संजय राऊतांशीही बोललो. सगळ्यांची मते जाणून घेऊन मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला,’ असे खोतकर यांनी स्पष्ट केले. ‘समर्थन केले म्हणजे संबंध थोडीच तुटतात, आमचे ४० वर्षांचे संबंध आहेत. मी पक्ष प्रमुखांना चार वेळा फोन केला, त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांना पूर्ण कल्पना दिली,’ असेही खोतकर म्हणाले.

कुटुंबाला होणाऱ्या त्रासामुळे निर्णय

‘घरी आलो की कुटुंब दिसते. त्यामुळे काही ठोस निर्णय घेणे गरजेचे होते. या गोष्टी मी उद्धव ठाकरेंच्याही कानावर घातल्या. त्यांनीही मला माझा निर्णय घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे मी आज शिवसैनिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे खोतकर म्हणाले.

शिवसेनेची प्रामाणिकपणे सेवा केली

‘आजपर्यंत शिवसेनेची प्रामाणिकपणे सेवा केली. मी व माझ्या सहकाऱ्यांनी सेनेचे जालन्यात वर्चस्व निर्माण केले. सामान्य माणसांनीही आमच्यावर विश्वास टाकला. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदारांनी आमच्या झोळीत भरभरून मतदान टाकले. पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला,’ असेही ते यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in