
काल कसब्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षातील ७ कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. कारण, त्यांनी पक्षाचे आदेश न पाळता कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांचा प्रचार केला. मात्र, मनसेने केलेल्या या कारवाईमुळे पक्षात मोठी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण, एकीकडे पुण्यात पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे मनसेच्या ५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे राज ठाकरेंची चिंता नक्कीच वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसेच्या तब्बल ५० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून मनसेने काल केलेल्या कारवाईचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत होणार आहे. अशामध्ये मनसेने उमेदवार जाहीर न करता भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, तरीही मनसेच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील ७ कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील तब्बल ५० जणांनी राजीनामे दिले. हे राजीनामे पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे.