जून महिना लागला म्हणजे सर्वाच्या नजरा या पावसाच्या दिशेने लागून असतात. शेतकरी देखील जूनपूर्वी आपल्या शेतीची मशागत करुन वरुण राजाची वाट पाहत असतो. आता सर्वांची प्रतिक्षा मिटणार आहे. राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामुळं शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी तयार रहावं. मात्र, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करण्याची घाई करु नये, असा सल्ला हवामान विभागाच्या तज्ञांनी दिला आहे. तसंच अरबी समुद्रात घोंगावणारं 'बिपरजॉय' चक्रीवादळ हे 14 जूनपर्यंत कायम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यातील कोकण किनारपट्टीवर पाऊस सुरु झाला आहे. पुढचे दोन दिवस बिपरजॉय चक्रीवादळाचे परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवणार असून पुढील दोन दिवस ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकणातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली होती. आता मात्र राज्यात मान्सून दाखल झाला असून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आज (11जून) रोजी दुपारी 1:30 वाजता राज्यात मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबतची घोषणा केली आहे.
पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत राज्यात मान्सूनचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी नैऋत्य मान्सूनचं 11 जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाल असल्याचं सागितलं आहे. तसंच दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशचा काही भाग मान्सूननं व्यापला असल्याची देखील माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.