रवी राणांना आवरा; गुलाबराव पाटील यांचे फडणवीसांना आवाहन

जळगाव येथे ते माध्यमांशी बोलत होते. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या काही दिवसांत चांगलीच जुंपली आहे
रवी राणांना आवरा; गुलाबराव पाटील यांचे फडणवीसांना आवाहन

तुमच्या जिल्ह्याच्या वादामुळे राज्याच्या ४० आमदारांची बदनामी करण्याची गरज नाही. एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सगळ्यांवर आरोप करणे असा होतो. त्यामुळे रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे, कोणी विकाऊ नाही या गोष्टीचा अभ्यास देखील त्यांनी केला पाहिजे. त्यामुळे रवी राणांना आवर घालावा’, असे आवाहन शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

जळगाव येथे ते माध्यमांशी बोलत होते. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या काही दिवसांत चांगलीच जुंपली आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांची समजूत घातली पाहिजे आणि या विषयावर पडदा पाडला पाहिजे. एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सगळ्यांवर आरोप करणे असे मला वाटते. त्यामुळे रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे’, अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली.

रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेतले नाहीत, तर समाजात चुकीचा संदेश जाईल आणि संभ्रम निर्माण होईल. ४० वर्षांचे करिअर पणाला लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना आवर घालावा. तसेच दोघांनाही शांत करावे, ही आमची प्रार्थना असल्याचेही पाटील म्हणाले.

राणा-कडू वादात मुख्यमंत्री करणार हस्तक्षेप

आमदार बच्चू कडू यांनी रवी राणांना १ तारखेचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे शिंदे-भाजप सरकारमधील अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून, रवी राणांना रविवारी भेटीसाठी बोलावले आहे. मुंबईत रविवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रवी राणा यांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in