बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

घोलप यांचा राजीनामा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे
बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

नाशिक : पाचवेळा आमदार राहिलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हुकमी एक्के बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे जळगाव दौऱ्यावर असताना घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सॲप केला. घोलप यांचा राजीनामा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

घोलप हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. आपल्याला डावलले जात असल्याची त्यांची भावना होती. घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. काही दिवसांपूर्वी शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिर्डीतून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याने बबनराव घोलप नाराज होते. त्यातच शिर्डी लोकसभा मतदारसंघात नव्या संपर्कप्रमुखांची निवड करताना आपल्याला विचारात घेतले नाही, म्हणून घोलप नाराज असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी, संगमनेर दौऱ्यात देखील बबनराव घोलप यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे घोलप यांनी ठाकरे यांच्यापासून फारकत घेत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. दरम्यान, बबनराव घोलप सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.

नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून पाचवेळा आमदार राहिलेले बबनराव घोलप हे १९९५ च्या युती सरकारच्या काळात मंत्री होते. त्यांनी नाशिक जिल्ह्यात ३० वर्षे एकहाती वर्चस्व ठेवत शिवसेनेला ताकद दिली. शिवसेना फुटल्यानंतरही त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले होते. आपल्या लेकीला उमेदवारी देण्याचे ते स्वप्न पाहत होते, पण भाऊसाहेब वाकचौरे पक्षात आल्याने ते अस्वस्थ होते. त्यामुळे नाराज झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in