
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर सक्रिय झाले आहेत. आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत दोन खासदारांसह नऊ आमदारांचं निलंबन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या दोन खासदारांमध्ये राष्ट्रवादीचे लोकसभेचे खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. याशिवाय एस आर कोलहली यांचही निलंबल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
आज दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत एकूण आठ महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सांगितलं की, "2019 मध्ये काही लोकांनी त्यांच्या सह्यांचं पत्र दिलं होतं ही गोष्ट खरी आहे. त्यात कुणाबरोबर युती करावी, पक्षाचं पुढील धोरण काय असावं. यावर चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. ती मी बैठक बोलवा असं म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर निवडणूक आली आणि त्यावर चर्चा झाली नाही." असं पवार म्हणाले.
या विषयावर बोलताना पवार पुढे म्हणाले की, "2024 मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल याचा मला पुर्ण विश्वास आहे. आज सत्तेत असलेल्यांना लोक दूर करतील. राज्यात विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या. त्यांची त्यांना किंमत चुकवावी लागेल", असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.