भाजप-अजित पवार वादाने कार्यकर्त्यांमध्येही चढाओढ!

भाजप-अजित पवार वादाने कार्यकर्त्यांमध्येही चढाओढ!

अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपच्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही पक्षांमधील दरी दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
Published on

रोहित चंदावरकर/मुंबई

अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपच्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही पक्षांमधील दरी दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी भाजपसोबत जात महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला खरा, पण सद्यस्थितीत दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांची सुरू असलेली चढाओढ पाहता दोन्ही पक्षांना एकमेकांची अडचण वाटत असल्याचेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे हातघाईवर आलेल्या कार्यकर्त्यांना आवरायचे कसे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांसमोर आहे.

नुकत्याच झालेल्या बारामती येथील कार्यक्रमाच्या वेळी बॅनरवरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. राष्ट्रवादीच्या बॅनरवरून भाजप नेत्याची छायाचित्रे काढून टाकण्यात आली होेती. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपने मोठाले बॅनर लावून बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. या बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची छायाचित्रे झळकली, पण पवारांचे चित्र मात्र वगळण्यात आले होते. मुंबई दौऱ्यात अमित शहांच्या यांच्या बहुतेक कार्यक्रमांच्या बॅनरवरही पवार गायब होते. यावरून ही बाब स्पष्ट होते की, पश्चिम महाराष्ट जो अजित पवार यांचा गड मानला जातो, काबीज करण्यासाठी दाेन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच चालू झाली आहे.

महायुतीत राहायचे की नाही याचा एकदाचा निर्णय घेऊन टाका़, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी इशारा दिला होता.

पवार यांच्या नजीकच्या नेत्याने सांगितलेल्या माहितीनुसार, भाजपने जर थोडा अधिक जोर लावला असता तर सुनेत्रा पवार निवडून आल्या असत्या. बारामतीच नव्हे तर शिरूरची जागा ही मिळवता आली असती. इंदापूर, दौंड, शिरपूर आणि मावळ हे तालुके अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीसाठी महत्त्वाचे आहेत. पण काही वर्षांपासून भाजपने पद्धतशीरपणे या भागात काम करून हा भाग काबीज करण्याची योजना केली आहे. राजकीय निरीक्षकांना वाटते की, भाजपला अजित पवारांशी युती करून फायदा झालेला नाही. त्यामुळेच भाजप राष्ट्रवादी आणि पर्यायाने अजित पवार यांच्यावर दबावतंत्राचा वापर करीत आहे.

logo
marathi.freepressjournal.in