
सध्या राज्यात भाजपवर विरोधक चारही बाजूने टीका करत आहे. नागपूरची झालेली तुंबई आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जाण्याचं वक्तव्य. यामुळे भाजप विरोधकांच्या कात्रीत चांगलाच अडकला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरंब कुलकर्णी यांची एक कविता 'एक्स'वर शेअर करत भाजपवर उपहासात्मक टीका केली आहे.
मी त्यांना म्हणालो
पाण्यात तरंगणारे तुमचे
नागपूर शहर आपण पाहू
ते म्हणाले
नको नको,
त्यापेक्षा आपण,
धाब्यावरच जाऊ.....!!!
या शिर्षकाची हेरंब कुलकर्णी यांची कविता सुप्रिया सुळे यांनी शेअर केली आहे.
नागपुरात शुक्रवारी रात्री पावसाने शहरातील सगळं कामकाज ठप्प केलं होतं. अवघ्या 4 तासात त्याठिकाणी 100 मिमी इतका पाऊस झाल्याने शहरातील अनेक सखल भागात वस्त्यांमध्ये पाणी साचलं. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे एका ५३ वर्षीय महिलेसह चार जणांचा मृत्यू देखील झाला. मुंबईत पावसाचे पाणी साचल्यानंतर देवेंद्र फडणवीस नेहमी आक्रमक भूमिका घेत असतात. मात्र, आता नागपूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न विरोधक भाजपाला विचारत आहेत.
त्यांच बरोबर भापजचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यात त्यांनी मीडियाला मॅनेज करण्याचा फॉर्म्युलाच जणू आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकी आधी नकारात्मक प्रचार रोखण्यासाठी पत्रकारांना ढाब्यांवर घेऊन जाणे, त्यांना चहाला घेऊन जाणं किंवा त्यांच्याकडे चहाला जाणं तसंच त्यांच्याशी चांगलं वागण्यास सांगितलं आहे. हा व्हिडिओ समोर येताच भाजपवर मीडियाला मॅनेज करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सगळीकडे होत आहे.