कोल्हापुरात काही तरुणांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरुन वातावरण चिघळलं आहे. यावरून संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात दोन गटात मंगळवारी वाद झाला. यावेळी दगडफेक झाली. यात दोन ते तीन गाड्यांच्या काचा देखील फोडण्यात आल्या. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (7 जून) रोजी कोल्हापुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. कोल्हापूरात सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेववल्याचा प्रकार समोर आल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. एकूण परिस्थिती पाहाता कोल्हापूरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर देखील हिंदुत्वावादी संघटनांनी मोर्चा काढला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे.
कोल्हापूर येथील आक्षेपार्ह स्टेट्स प्रकणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीश: लक्ष घातलं असून या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. काल एका राजकीय नेत्याने कोल्हापुरात दंगल होऊ शकते, असं म्हटलं होते. त्यानंतर कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबचे स्टेट्स ठेवलं आणि त्यानंतर ही तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात औरंगजेबावरचं प्रेम अचानक आलं नसून यामागे निश्चितच सूत्र असल्याचं मत नितेश राणे यांनी मांडलं आहे. या प्रकरणात त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केला आहे. संजय राऊत मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दंगल होणार असल्याचं बोलत आहे. तेव्हापासून हे प्रकार सुरु झाल्याचं राणे यांनी म्हटलं. तसंच त्यांनी या प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. या दंगलींमागे उद्धव ठाकरे यांचा हात आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. यावेळी त्यांना राज्यात मुगलाईच राज्य आणायचं असेल तर स्वराज्याचं रक्षण करायला आम्ही तयार असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.