न्यायालयाचा निकाल गावपातळीपर्यंत पोहोचवा- उद्धव ठाकरे

शिवसेना ठाकरे गटाचा यंदाचा १९ जून रोजी होणारा वर्धापनदिन जोशात साजरा करण्यात येणार आहे
न्यायालयाचा निकाल गावपातळीपर्यंत पोहोचवा- उद्धव ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूनेच लागलेला आहे. व्हीप, गटनेता आपलाच मान्य करण्यात आलेला आहे. मात्र तरीही काहीजण त्यांच्याच बाजूने निकाल लागल्याचे पेढे वाटत फिरत आहेत. न्यायालयाचा निकाल काय आहे ? हे गावपातळीवरील सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख तसेच महिला संघटक यांना दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा यंदाचा १९ जून रोजी होणारा वर्धापनदिन जोशात साजरा करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी या निकालातील तांत्रिक मुद्दे तसेच नेमका निकाल काय आहे ? याची माहिती सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत पोहोचविण्याचे ठरविले आहे. दोन दिवसांपुर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना या निकालातील तांत्रिक मुद्दे समजवून देण्यात आले. बुधवारी शिवसेनाभवन येथे जिल्हाप्रमुख तसेच महिला आघाडीच्या संघटिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील तांत्रिक मुददे समजवून देण्यात आले. व्हीप तसेच गटनेता कोणाचा मान्य करण्यात आला आहे. कोणाचा अमान्य करण्यात आला आहे याचीही माहिती देण्यात आली.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची तांत्रिकरित्या सर्व माहिती जशी आमदारांना दिली गेली. तशीच माहिती जिल्हाप्रमुख, महिला आघाडी संघटिकांना दिली आहे. निकाल विरोधात लागलेला असला तरीही काही जण पेढे वाटत आहेत. निकाल काय लागला आहे त्याची मुद्दे निहाय माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. हा निकाल गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला आहे. बैठकीत लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झालेली नाही. कारण शिवसेना कायमच निवडणुकांसाठी तयार असते. शिवसेनेचा येता वर्धापनदिन दरवर्षीप्रमाणेच उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचेही अंबादास दानवे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in