राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
अंदमानात सोमवारी सहा दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे महाराष्ट्रातही नैऋत्य मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
येत्या चार-पाच दिवसांत म्हणजे २१ मेपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी (१९ मे) मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळपर्यंत उस्मानाबादमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर सातारा, सांगली, कोल्हापूर येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
मान्सून २ जूनपर्यंत कोकणात
मान्सून तळकोकणात २ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. कोकण समुद्रकिनारपट्टीवर सध्या फेसाळत्या लाटा उसळत आहेत. त्या किनाऱ्यावर धडकू लागल्या आहेत. ही परिस्थिती म्हणजे मान्सूनची चाहूल मानली जाते.