महाराष्ट्र दौरा रद्द करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना; एका महिन्यात सहावा दिल्ली दौरा

दिल्लीतून अंतिम आदेश घेऊन येतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र दौरा रद्द  करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  तातडीने  दिल्लीला रवाना; एका महिन्यात सहावा दिल्ली दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा रद्द करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रात्री तातडीने औरंगाबादवरून दिल्लीला रवाना झाले. एका महिन्यातील त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे. शिंदे हे सतत दिल्लीत धाव घेत असल्यामुळे विरोधकांकडून त्यांना वारंवार लक्ष्य करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ते मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला जातात, पण मंत्रिमंडळ विस्ताराला त्यांना अद्याप मुहूर्त मिळू शकलेला नाही. त्यामुळे यावेळी तरी ते दिल्लीतून अंतिम आदेश घेऊन येतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात सत्तांतर होऊन साधारण एक महिना उलटला आहे. मात्र, अद्याप शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच मंत्रिमंडळ विस्तारावर मागील काही दिवसांपासून भाजपचे दिल्लीमधील वरिष्ठ नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरू आहे. शिंदे महिन्याभरात आतापर्यंत एकूण पाच वेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. शनिवारीही ते औरंगाबादचा दौरा आटोपून पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. शिंदेंच्या या दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम रूप मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराचीही तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या दोन मंत्र्यांचे सरकार कारभार पाहत आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे येत्या ३ ऑगस्टपूर्वी राज्यात नक्की मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. दरम्यान, सोमवारी सुप्रीम कोर्टात शिंदे सरकारला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या अनेक याचिकांवर सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीवर सरकारचे व शिवसेनेचे भवितव्य अवलंबून असल्याने त्याबाबतही शिंदे हे भाजपशी चर्चा करण्याची शक्यता असल्याचे मानले जाते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in