राज्यातील कोणते बसस्थानक स्वच्छ, सुंदर अभियानात ठरले १ नंबर? मिळाले ५० लाखांचे बक्षीस

ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली. सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते.
राज्यातील कोणते बसस्थानक स्वच्छ, सुंदर अभियानात ठरले १ नंबर? मिळाले ५० लाखांचे बक्षीस

मुंबई : एसटी महामंडळाने घेतलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर या अभियानांतर्गत ‘ब’ वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला. तसेच ‘क’ वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला आहे.

मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून १ मे, २०२३ ते ३० एप्रिल, २०२४ या कालावधीत एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात आले. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटरकुलर, घड्याळ, सेल्फीपॉईंट, ही कामे करण्यात आली. या बरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा, बसेसच्या स्वच्छतेबरोबरच त्यांची तांत्रिक दुरूस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळ्या सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षिसासाठी निवड करण्यात आली आहे.

ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली. सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. अ वर्गातील पहिल्या बसस्थानकाला ५० लाखाचे बक्षीस मिळाले आहे. ब वर्गात प्रथम आलेल्या बसस्थानकाला २५ लाखाचे बक्षीस मिळाले आहे. तर क वर्गात प्रथम आलेल्या बसस्थानकाला १० लाखाचे बक्षीस मिळाले आहे.

पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतीम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले.

स्पर्धेसाठी तब्बल अडीच कोटींची बक्षीसे

या स्पर्धेसाठी तब्बल अडीच कोटी रूपयाची बक्षीसे देण्यात येणार आहेत. येत्या १५ ऑगस्टला बक्षीसपात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व बक्षीसपात्र बसस्थानकांचे अभिनंदन केले असून, या अभियानातून ‘आपलं गावं आपलं बसस्थानक, स्वच्छ सुंदर बसस्थानक’ ही संकल्पना एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबरच स्थानिक रहिवाशांमध्ये रूजविण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in