छत्रपती संभाजीनगर : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलबाहेर शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी सकाळी तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. अर्धा तास सुरू असलेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांना अटक केली.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजपने विरोध केला. ‘रामा हॉटेल’च्या बाहेर आदित्य ठाकरे यांना भाजपने काळे झेंडे दाखवले. तसेच घोषणाबाजी करण्यात आली. दिशा सालियनचे फोटो असणारे पोस्टर घेऊन यावेळी निषेध करण्यात आला. आदित्य ठाकरे यांना विरोध करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात निदर्शने केल्याने स्थानिक भाजप नेते संतप्त झाले होते. त्या आंदोलनाला उत्तर म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर निदर्शने करण्याचा निर्णय भाजपने घेतला. भाजपच्या या आंदोलनाची चाहूल ठाकरे गटाला लागली. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी रात्रीच ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सकाळी ९ वाजताच आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलबाहेर जमण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, राजेंद्र दानवे, राजू शिंदे, युवासेनाचे ऋषी खैरे, हनुमान शिंदे, मिथुन व्यास, चेतन कांबळे, मनोज गांगवे, महिला आघाडीच्या आशा दातार, सुनीता पाटील, सुकन्या भोसले, सुनीता औताडे, दीपाली पाटील, रेखा फलके यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्ते सकाळीच हॉटेलबाहेर जमा झाले.
दरम्यान, दिशा सालियन प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी भाजपचे पदाधिकारी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय केणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते घोषणाबाजी करीत तेथे पोहोचले. भाजप कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या घोषणाबाजीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनीही भाजप नेत्यांविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. काही वेळातच संतप्त कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. भाजप कार्यकर्ते आणि अंबादास दानवे आमनेसामने आले. परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. नंतर दोन्ही गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
भाजपने जे आंदोलन केले ते करायची गरज होती का? काल जे आंदोलन पंतप्रधान मोदींच्या विरोधात झाले ते राजकीय नव्हते, मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केले. मी काही कोणत्या पदावर आहे का? माझ्या विरोधात आंदोलन करायला. आम्ही राज्यातील महिला अत्याचाराविषयी सरकारला जाब विचारत आहोत. गरोदर महिलेला पोलीस ठाण्यात बसवून ठेवता, दहा दिवस गुन्हा दाखल करत नाहीत म्हणून आमचे आंदोलन होते. सरकारच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी जनरल डायर कोण आहे? जरांगे यांच्या आंदोलनात लाठीमार आणि गोळीबार केला, वारकऱ्यांवर लाठीहल्ला केला. राज्यात वातावरण बिघडले आहे. पोलिसांची चूक नसते, त्यांना वरून आदेश येतात, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
भाजपवाले ज्यांना घाबरतात, त्यांची बदनामी करतात - आदित्य
दिशा सालियन प्रकरणाबाबत भाजपने केलेल्या आरोपांबाबत आदित्य ठाकरेंनी मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले. भाजपचे नेते ज्यांना घाबरतात, त्यांची बदनामी करण्याचे काम ते करतात, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
या परिस्थितीला पोलीस जबाबदार : अंबादास दानवे
या परिस्थितीला पोलीस जबाबदार आहेत. त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी होती, जी त्यांनी घेतली नाही. यासंदर्भात मी काल रात्री पोलीस आयुक्तांना फोन केला होता. मात्र, तरीही त्यांनी दखल घेतली नाही, असे अंबादास दानवे म्हणाले. तसेच पोलिसांनी केवळ शिवसेनेच्या (ठाकरे गट) कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेतली, असा आरोपही त्यांनी केला.