“घासून नाही, ठासून विजय मिळवला…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला. तो उठाव योग्य होता हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“घासून नाही, ठासून विजय मिळवला…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : आज शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापनदिन शिवसेना शिंदे गटाकडून साजरा दिमाखदार पद्धतीनं साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. आपण शिवसेनेचे बालेकिल्ले अबाधित राखले. घासून पुसून नाही ठासून विजय मिळवला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

त्यांना हिंदू बोलायला लाज वाटते...

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, " बाळासाहेब ठाकरे ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो भगिनींनो, असं म्हणायचे. पण आज त्यांचा वारसा म्हणणारे हिंदू बोलायला लाज वाटते, हिंदू शब्दाची अॅलर्जी आली. शिवसेनेचे मूळ मतदार आपल्याकडे आहेत. मग इतर मतं कशी आली, कसे उमेदवार जिंकले, हे महाराष्ट्राला माहिती आहे. ही तात्पुरती आलेली सूज आहे’, असं एकनाथ शिंदेंनी दिलं.

दोन वर्षांपूर्वी आपण उठाव केला...

शिंदे पुढे म्हणाले की, “आज काँग्रेसच्या दावनीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला. तो उठाव योग्य होता हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवलं. आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता. हे आपण निवडणुकीमध्ये पाहिलं. जनतेच्या विश्वासाला आपण कधाही तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी देतो."

आपण शिवसेनेचे बालेकिल्ले अबाधित ठेवले...

"आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. आज ठाणे, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वाढली आहे. आपण या निवडणुकीत शिवसेनेचे बालेकिल्ले अबाधित ठेवले आहेत. ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर आपण जिंकलं आहे. कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला. त्यामुळे मनापासून सर्वासमोर मी नतमस्तक होतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in