सडावाघापूर पठारावर बहरली रंगीबेरंगी फुले

पिवळी, पांढरी, निळी अशा रंगांनी पठार व्यापले आहे.
सडावाघापूर पठारावर बहरली रंगीबेरंगी फुले

कराड : सातारा शहराजवळील जागतिक वारसा असलेल्या कासच्या धर्तीवर सडावाघापूर पठारावर देखील रंगीबेरंगी फुलांच्या रंगांची उधळण पाहायला मिळत असून, पिवळी, पांढरी, निळी अशा रंगांनी पठार व्यापले आहे. उलट्या धबधब्याने प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या सडावाघापूर पठाराचे या रानफुलांमुळे देखील नाव होऊ लागले आहे. सध्या फुलांच्या विविधरंगी उधळणीसह अनेक पर्यटक इकडे येत असून, पठारावर मुक्तपणे विहार करीत निसर्ग, फुले, थंड वारा याचा आस्वाद घेत आहेत. येथील फुलांची दुनिया दरवर्षी बहरते मात्र अभ्यासकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे; मात्र सध्या कासच्या धर्तीवर येथे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास झाल्यास व फुलांचे संवर्धनं झाल्यास सडावाघापूर पठारही फुलांचे जागतिक वारसा स्थळ बनू शकते, असा विश्वासही व्यक्त होत आहे.

सडावाघापूर पठार हे उलटा धबधबा,विस्तीर्ण पठार,गगनचुंबी पवनचक्क्या, हिरवे गालिचे, धुक्याची दुलई, धुक्यात हरविलेल्या पवनचक्क्या, रस्ते व घरे पाहणेसोबत भिजायला पाऊसधारा हे पावसाळ्यातील स्वर्गसुखच ठरले आहे. ते येथे अनुभवायला मिळते. हा अनुभव घेण्यासाठी व निसर्ग डोळ्यात साठवण्यासाठी पावसाळ्यात हजारो पर्यटक पठारावर गर्दी करतात. अगदी पुणे मुंबईपर्यंत याचे लोण पसरले आहे. याचप्रमाणे पाऊस संपला, पठारावर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये रंगांची दुनिया बहरू लागते. अनेक जण इकडे भेटी देत आहेत. कासच्या तुलनेत येथील बहर कमी व लहान फुले असतात.मात्र, येथे कसलीही बंधने नसल्याने पर्यटकांना मुक्त विहार करता येतो. आताही पठारावर फुलोत्सव सुरू आहे.

कमी पावसाचा प्रतिकूल परिणाम

सीतेची आसवं, पिवळी सोनकी, पिवळी मिकी माउस, पांढरे गेंद आशा फुलांनी पठारावर गर्दी केली आहे. गेली अनेक वर्षे हा फुलोत्सव सुरू आहे. यंदा कमी झालेला पाऊस व वाढत्या उन्हाच्या चटक्याने फुलांवर परिणाम झाला आहे. मागील आठवड्यातील पावसाने वातावरण आल्हाददायक झाले आहे. सध्या फुले अखेरच्या टप्प्यात आहेत, तरीही मुक्त वावर असल्याने अनेक जण पठारावर भेटी देत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in