विधान परिषद निवडणुकांवरून काँग्रेस-ठाकरे गटात धुसफूस, ठाकरेंकडून प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेस अस्वस्थ

विधान परिषद निवडणुकांवरून काँग्रेस-ठाकरे गटात धुसफूस, ठाकरेंकडून प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेस अस्वस्थ

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात घवघवीत यश मिळविले. मात्र, विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडतो की काय, अशी स्थिती आहे.

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात घवघवीत यश मिळविले. मात्र, विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडतो की काय, अशी स्थिती आहे. महाविकास आघाडीत चर्चा न करता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. ठाकरे गटाने कोकण आणि नाशिक शिक्षकमधून उमेदवार मागे घ्यावा म्हणून काँग्रेसने उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ जून रोजी निवडणूक होत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीतील प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार दिले आहेत. मनसेने कोकण पदवीधरमधून माघार घेतली आहे. लोकसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवावी, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी संपत आहे. त्यामुळे बुधवारी तोडगा निघाला नाही तर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविणे अपरिहार्य ठरणार आहे.

विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. परंतु, शिवसेनेने परस्पर कोकण, नाशिक तसेच मुंबई मतदारसंघासाठीचे उमेदवार जाहीर केले.

विधान परिषद निवडणुकीचा निर्णय एकत्र बसून केल्यास महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे चांगले यश मिळू शकेल यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला, तेव्हा ते परदेशात होते. मातोश्रीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतो, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, एकीकडे नाना पटोले ठाकरेंशी संपर्क होत नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे गेल्या तीन-चार दिवसांत मात्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तसेच नवनिर्वाचित खासदारांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराज, वर्षा गायकवाड, बळवंत वानखडे, डॉ. शोभा बच्छाव यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे ठाकरे पटोले यांना टाळत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

नीट परीक्षा रद्द करा - पटोले

दरम्यान, नीट परीक्षेत घोटाळा झालेला असून डॉक्टर बनण्याचे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या परीक्षेचे सर्व नियंत्रण केंद्र सरकारकडे असते, ही परीक्षाच भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे. आपला मुलगा डॉक्टर व्हावा यासाठी पालक लाखो रुपये खर्च करतात. पण या भ्रष्टाचारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली आहे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांनी डॉक्टर होऊ नये हे भाजपचे षडयंत्र आहे. नीट परीक्षा जुन्याच पद्धतीने घेतली पाहिजे, या परीक्षेत झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करून दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in