राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसह शिंदे सरकारमध्ये सामिल होत मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपावरून शिंदे गटासह भाजपमधील काही आमदार यांचा विरोध असल्याने तर काही महत्वाच्या खात्यांसाठी हे मंत्री अडून बसल्याने खातेवाटप लांबणीवर पडत होता. नुकताच बहुरचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा खातेवापटाचा कार्यक्रम पार पडला असून यात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना वजनदार खाते देण्यात आले आहेत. खातेवाटप झाल्यानंतर अजित पवार यांच्या गटातील मंत्र्यांनी कामकाजाला सुरुवात देखील केली आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील मंत्र्यांची बैठक पार पडली. ही बैठक नेमकी कशासंदर्भात होती. तसंच या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक पार पडली. महत्वाचं म्हणजे या बैठकीनंतर अजित पवार गटातील मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले आहेत. मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटर येथे हे मंत्री रवाना झाले आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुत्रीफ, छगन भुजबळ या मंत्र्यांचा समामेश आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या ठिकाणी झालेल्या बैठकीत खासदार सुनिल तटकरे यांनी मार्गदर्शन केल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, बैठक झाल्यानंतर बैठकीला उपस्थित असलेले सर्व मंत्री अजित पवार यांच्यासह वाय. बी. चव्हाण सेंटरला पोहचले आहे. विशेष म्हणजे या बैठकीला जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाय यांची देखील उपस्थिती आहे.