देवेंद्र फडणवीस यांना तूर्तास अभय; अजित पवारांसोबतचा ‘दोस्ताना’ही कायम, भाजप हायकमांडच्या बैठकीचे स्पष्ट संकेत

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ताक फुंकून प्यायला सुरुवात केली आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसFPJ

रोहित चंदावरकर/मुंबई

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ताक फुंकून प्यायला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षाने फेटाळली असून त्यांना तूर्तास अभय मिळाले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला डच्चू देण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून महायुतीत त्यांचा ‘दोस्ताना’ कायम राहणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या महायुतीतील मित्रपक्षांसोबत जागावाटपाची तयारी सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांसोबत विधानसभेत युती कायम ठेवायची की नाही, याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अभय मिळाल्याचे कळते.

फडणवीस यांच्या निकटच्या सूत्रांनी सांगितले की, फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली. तसेच मला केवळ विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत करू द्यावे, असे म्हणणे त्यांनी मांडले. पण, पक्षनेतृत्वाने त्यांना सरकारमध्ये कायम राहण्यास सांगितले आहे.

राज्यातील सर्व मतदारसंघातील मतदानाचे विश्लेषण भाजपने पूर्ण केले आहे. महायुतीतील अन्य पक्षांचा कसा लाभ झाला याचा अभ्यास केला. प. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात महायुतीला मते मिळायला हवी होती, ती मिळाली नसल्याचे आढळले. मावळ, माढा व शिरूर मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाचा प्रभाव असेल असे भाजपला वाटत होते. पण, शिंदे गटाचे शिरूर मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील तेथे पराभूत झाले. केवळ रायगडातील एक जागा त्यांना मिळाली. अजित पवार यांना सोबत घेऊन फारसा लाभ झाला नसल्याचा निष्कर्ष भाजपने काढला आहे.

यासंदर्भात भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, अनेक जागा या अत्यल्प मतांनी पडल्या आहेत. महायुतीतील अन्य पक्षांचा विचार करून भाजपने निर्णय घेतले. काही ठिकाणी त्याचा फायदा झाला तर काही बाबींमुळे त्याचा लाभ पक्षाला मिळू शकला नाही. आम्ही महायुतीतील एका पक्षावर त्याबाबत आरोप करू शकत नाही, असे ते म्हणाले.

अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, काही उमेदवार पराभूत होण्यास काही एकमेव कारण नाही. पराभवाचे खापर एका पक्षावर फोडणे योग्य नाही. आमच्यासोबत युती करण्याबाबत भाजप पुनर्विचार करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र आम्ही महायुतीत कायम आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटासोबत जागा वाटप करताना अधिक जागा आपल्या पदरात पाडून घेणार असल्याचे कळते. कारण त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत केवळ एकच जागा मिळाली आहे. तर अजित पवार यांना महायुतीत घेतल्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागल्याचे भाजपच्या एका गटाचे म्हणणे आहे. पण, अजित पवार यांच्याशी युती न तोडण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in