
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. यामुळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. शिंदे आणि फडणवीस आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे नाराज असलेल्यया अजित पवारांचा वाढता दबाव हे या दिल्ली दौऱ्यामागचं मुख्य कारण आहे का? असं देखील दबक्या आवाजात बोललं जात आहे. सध्याच्या राजकीय परिस्थीतीमुळे ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे का?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार हे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा बळावल्या आहेत. राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा अद्याप न सुटलेला पेच यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणं गरजेचं आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले असल्याचं सांगितलं जात आहे.