जालना : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली व त्यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली. धनंजय मुंडेंनी अचानक मनोज जरांगेंची भेट घेतल्याने विविध तर्कवितर्क केले जात आहेत.
मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आरक्षणावर चर्चा झाल्याचे मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले की, मी झोपेत होतो. पहाटेच्या तीन वाजता ते आले असतील. आमच्यात जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. अंतरवालीत कोणीही येऊ शकतो. आमच्याकडे आयते मैदान आहे. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची चांगली कामे केली, तर कौतुक का करू नये? आमची आरक्षणावरही चर्चा झाली. मी कोणाचाच होऊ शकत नाही. महाविकास आघाडीचा नाही, महायुतीचा नाही, मी फक्त मराठ्यांचा आहे, असे ते म्हणाले.
मराठा परिवर्तनाच्या दिशेने निघालाय !
निवडणुकीच्या तयारीसाठी कागदपत्रे अगोदरच काढून ठेवा. मराठा आता परिवर्तनाच्या दिशेने निघालेला आहे. माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळावे यावर मी कायम ठाम असणार आहे.