शिंदे गटात असंतोष! लवकरच बॉम्बस्फोट होणार असल्याचा ठाकरे गटाच्या खासदाराचा दावा

शिंदे गटाचे 22 आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असून, 9 खासदार देखील संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.
शिंदे गटात असंतोष! लवकरच बॉम्बस्फोट होणार असल्याचा ठाकरे गटाच्या खासदाराचा दावा

राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोप तसेच दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आगामी महापालिका तसेच लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष तयारी करताना दिसून येत आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट आपले अस्तीत्व दाखवण्यासाठी पुर्ण ताकदीने या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहेत. तर महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जसजश्या निवडणुका जवळ येत आहेत. तसतसे ठाकरे- शिंदे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. अशात आता ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या दाव्याने चर्चेला उधाण आले आहे. शिंदे गटाचे 22 आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असून, 9 खासदार देखील संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. शिवसेना (ठाकरे गट) खाससदार विनायक राऊत यांनी हा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतचा दावा केला आहे. विनायक राऊत म्हणाले की, "शिंदे गटाचे 22 आमदार हे वैतागून गेले आहे. ते शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. तर 13 पैकी 9 खासदार हे आमच्या संपर्कात आहेत. खासदार शिंदे गटाला वैतागले आहे. त्यांची कामे होत नाहीत. तुच्छतेची वागणूक मिळते. कुणालाही किंमत मिळत नाही, अशी तक्रार आमदार खासदार करत आहे", असा दावा राऊत यांनी केला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पंधरा दिवसांपूर्वी शिंदे गटाचे शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवून इकडे आमची गळचेपी होत असल्याचे सांगितले. तसेच तानाजी सावंत आणि गजानन कीर्तिकर यांनी देखील त्यांची खंत बोलून दाखवली आहे. तानाजी सावंतांना बजेट मिळत नसल्याने आगीतून निघून फुफाट्यात पडल्याचे सावंत म्हणत आहेत. शिंदे गटाच्या आमदार, खासदारांची कोंडी होत असून भाजपने त्यांना नमोहराम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असा दावा विनायक यांनी केला आहे.

यामुळे अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करायला सुरुवात केली आहे. काहींशी बोलणे देखील झाले आहे. त्यांची नावे ऐन वेळी जाहीर करु. लवकरच बॉम्बस्फोट होणार आहे. गजानन कीर्तिकरांनी फटाके फोडले आहेत. त्यांना दट्ट्या मिळाल्यावर ते गप्प बसतील. पण थोडे थांबा फटाक्यांची माळ लागणार असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in