घटना बदलण्याच्या अपप्रचाराला बळी पडू नका - अजित पवार; दादांचे पावसात भिजत भाषण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवावा, घटना बदलण्याचे प्रयत्न केले जात असल्यासारख्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात केले.
घटना बदलण्याच्या अपप्रचाराला बळी पडू नका - अजित पवार; दादांचे पावसात भिजत भाषण
प्रातिनिधिक फोटो
Published on

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवावा, घटना बदलण्याचे प्रयत्न केले जात असल्यासारख्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात केले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी बारामतीतील मिशन हायस्कूल ग्राऊंडवर जनसन्मान मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. ‘हौशे, नवशे, गवशे कोणी येतील आणि काहीही सांगतील. त्यांना आता भुलू नका. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांनी काही सांगितले तर अजितदादांवर आमचा विश्वास आहे म्हणून सांगा. हा अजितदादा शब्द देणारा आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण सर्वजण हयात असेपर्यंत घटना बदलण्याचे धाडस कोणीही करू शकणार नाही. गरीब, शेतकरी, महिला यांच्या कल्याणासाठी सत्तेचा वापर करण्यावर आपला विश्वास आहे. आपण सादर केलेल्या अर्थसंकल्पातही हेच अधोरेखित करण्यात आले आहे, असे अजित पवार म्हणाले.

गरिबीचे निर्मूलन आणि विकास हाच आपल्या पक्षाचा कार्यक्रम आहे, तर आपले विरोधक अपप्रचार करून असत्य माहिती पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. साखरेच्या किमान हमीभावामध्ये वाढ करण्याची विनंती आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे. दूध भुकटी आणि कांदा यांची आयात केली जाणार असल्याच्या असत्य प्रचाराला कोणीही बळी पडू नये. कोणत्याही जाती-धर्माच्या कोणावरही महायुतीकडून अन्याय होणार नाही, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठीच अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना, तीन सिलिंडर मोफत, मुलींसाठी महाविद्यालयीन शिक्षण मोफत, शेतकऱ्यांना मोफत वीज आणि युवकांसाठी कौशल्यविकास यांचा समावेश करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

अजितदादांचेही पावसात भिजत भाषण

या मेळाव्यात पावसाने मोठा व्यत्यय आणला. अचानक पाऊस आल्याने इतर नेत्यांची भाषणे थांबवून अजित पवारांना भाषण करावे लागले. अजितदादांनीही भरपावसात भाषण करून विरोधकांवर जोरदार हल्ले चढवले. अजित पवारांनी भरपावसात भाषणाला सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या आणि अजितदादांच्या नावाचा जयघोष सुरू केला.

logo
marathi.freepressjournal.in