निवडणुकीच्या काळात ईडीचे महाराष्ट्र, गुजरातमध्ये छापे

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच अंमलबजावणी महासंचालनालयाने (ईडी) ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत एका प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली. मालेगावच्या व्यापाऱ्याने १०० कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी अनेक जणांच्या बँक खात्यांचा गैरवापर केल्याचा दावा ‘ईडी’ने केला.
निवडणुकीच्या काळात ईडीचे महाराष्ट्र, गुजरातमध्ये छापे
Published on

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच अंमलबजावणी महासंचालनालयाने (ईडी) ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत एका प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली. मालेगावच्या व्यापाऱ्याने १०० कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी अनेक जणांच्या बँक खात्यांचा गैरवापर केल्याचा दावा ‘ईडी’ने केला.

महाराष्ट्रातील मालेगाव, नाशिक, मुंबई व गुजरातमधील अहमदाबाद-सुरत येथील २३ ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा, ओदिशा आणि पश्चिम बंगालमधील २,५०० व्यवहार व १७० बँकेच्या शाखांची चौकशी सुरू आहे. या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले किंवा काढण्यात आले आहेत.

मालेगाव येथील व्यापारी सिराज अहमद हारुन मेमन याच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या व्यक्तीच्या बँक खात्यातून अवैध व्यवहार करण्यात आले होते. या बँक खात्याचा वापर निवडणूक निधी व मत जिहादसाठी करण्यात आल्याचा आरोप आहे.

मुख्य आरोपी सिराज अहमद हारुन मेमनने नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेत खाते उघडण्यासाठी १२ जणांचे केवायसीचे पेपर्स घेतले होते. मला व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांकडून पैसे घ्यायचे आहेत, असे त्याने त्या लोकांना सांगितले होते.

आरोपीने आपल्या मित्रांकडून ‘केवायसी’चे पेपर घेऊन बँक खाती उघडली होती. ही खाती सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये उघडली होती. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगालमधील २०० हून अधिक बँक शाखांमधून ४०० व्यवहारातून पैसे काढले गेले, तर १७ बँक खात्यांतून पैसे हस्तांतरित केले गेले.

१०० कोटींचे डेबिट, क्रेडिट व्यवहार

१०० कोटींच्या डेबिट-क्रेडिट व्यवहार ‘ईडी’ला सापडले आहेत. मुंबई आणि अहमदाबादच्या दोन खात्यांमध्ये ५० कोटींहून अधिक पैसे हस्तांतरित केले. यात सिराज अहमद व नईम खान यांचे नाव समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in