
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी खुले आव्हान दिले आहे. ‘आदित्य आणि मला अडकवण्याचे षडयंत्र कशा प्रकारे रचले गेले हे आता जगजाहीर झाले आहे. माझ्याकडे ना पैसा ना चिन्ह तरी कट्टर शिवसैनिकांच्या ताकदीवर आज मी आणि शिवसेना पुन्हा पाय रोवून उभे राहिलो आहोत. त्यामुळे तुम्ही हवी तेवढी ताकद पणाला लावा, यापुढे राजकारणात एक तर तुम्ही रहाल किंवा मी राहीन’, असे खुले आव्हान शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. ‘विधानसभा निवडणुकीनंतर तिघांनाही गावी पाठवणार’, असा टोलाही त्यांनी लगावला. रंगशारदा येथे बुधवारी शिवसेना शाखाप्रमुखाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांनी यावेळी फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले. लोकसभेत ‘मविआ’ने जी कामगिरी केली, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला घाम फुटला आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अनिल परब यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यासाठी फडणवीस यांनी दबाव आणल्याचा पर्दाफाश माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकताच केला. त्यानंतर फडणवीस विरुद्ध महाविकास आघाडी वाद चिघळला आहे. देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. त्यातच बुधवारी शिवसेना शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लक्ष्य करत सडकून टीका केली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विशेष करून ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. शिवसेनेला आणि ठाकरे कुटुंबांला या ना त्या प्रकारे त्रास दिला जात आहे. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अनेक डाव रचले होते. मात्र हे सगळे सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो. माझ्या पाठीशी निष्ठावंत शिवसैनिक आहे, त्यामुळे तुम्ही कितीही षडयंत्र रचले तरी बाळासाहेबांची शिवसेना हिंमतीने आजही उभी आहे आणि भविष्यातही ताकदीने उभी राहणार, असा चिमटा ठाकरे यांनी काढला.
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यातून त्यांनी मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरेंना चिथावणी देणारी भाषा शोभत नाही. त्यांनी ज्याप्रकारच्या शब्दांचा वापर केला, ते जर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ऐकले असते तर त्यांना काय वाटले असते. उद्धव ठाकरे अशा भाषेचा वापर हिंदुत्व सोडून ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर करीत आहेत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
कुणी नादाला लागला तर मी सोडत नाही - फडणवीस
उद्धव ठाकरे यांनी मर्यादा सोडून भाष्य केले. मी सहसा कुणाच्या नादाला लागत नाही, आणि माझ्या कुणी नादाला लागला तर मी सोडत नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना दिला.
एमएमआरडीए रद्द करणार
विधानसभा निवडणुकीनंतर मविआची सत्ता आल्यानंतर ‘एमएमआरडीए’ रद्द करणार, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.