मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले; चंद्रकांत पाटील यांचे खळबळजनक वक्तव्य

शिवसेनेने विश्वासघात करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले
मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले; चंद्रकांत पाटील यांचे खळबळजनक वक्तव्य

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले याचे आपल्याला अतिशय दुःख झाले,” असे खळबळजनक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पनवेल येथे केले. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी व कार्यसमितीच्या पनवेल येथे झालेल्या बैठकीचे उद्‌घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले. त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, सह सरचिटणीस शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय व प्रदेश स्तरावरील अनेक नेते बैठकीस उपस्थित होते. यावेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले की, “भाजप व शिवसेना युतीला २०१९मधील निवडणुकीत बहुमत मिळाले; पण शिवसेनेने विश्वासघात करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले; मात्र गेल्या अडीच वर्षांत कोरोनामध्ये जनतेचे प्रचंड हाल झाले. विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचे काम झाले. त्यामुळे राज्यात सत्ताबदलाची गरज होती, तसे होत असताना देवेंद्र फडणवीस सारख्या एका निर्णयक्षम चांगल्या नेत्याकडे नेतृत्व जाण्याची गरज होती; पण तसे झाले नाही. त्यामुळे मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपल्या सर्वांना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, असा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने दिला आणि तो फडणवीस यांनी मान्य केला.” असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहूर उठले आहे. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in