अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेत बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटानी आपणच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केलाय. शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत आयोगाने अजित पवार यांच्या गटाला नोटीस पाठवली होती. आता अजित पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. येत्या तीनआठवड्यात पक्षासंदर्भाती कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश या नोटीसद्वारे देण्यात आले आहेत. ही कागदपत्रे दोन्ही गटांनी एकमेकांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दि हिंदूने याबाबतीची बातमी दिली आहे.
दि हिंदूच्या वृत्तानुसार, शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्याने ही नोटीस आल्याचं मान्य केलं आहे. विधान सभेत सर्वाधिक संख्याबळाच्या आधारे अजित पवार गटाने पक्षावर दावा केला आहे. त्यांच्या दाव्यावर उत्तर देण्यास आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. यावेळी आम्हीही निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती, त्यावेळी अजित पवार गटालाही निवडणूक आयोगाने अशी नोटीस पाठवली होती, अशी माहिती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने दिली. आम्ही विहित कालावधीत आयोगाला उत्तर देऊ, असं देखील या वरिष्ठ नेत्यानं सांगितलं
शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत देखील दोन गट पडल्याने राष्ट्रवादी नेमकी कोणाची असा पक्षांतर्गत वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता निवडणूक आयोगात पोहचल्याने आयोगाकडून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दोन्ही गटाकडून या संदर्भातील कागदपत्रे सादर केली जाणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाला मिळतो आणि निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.