नांदेडच्या घटनेनंतरही सरकार सुस्तच! छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू

मृत पावलेले रुग्ण हे बाहेरून रेफर केलेले किंवा मरणासन्न अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते, अशी माहिती रुग्णालयाचे डीन संजय राठोड यांनी दिली आहे.
नांदेडच्या घटनेनंतरही सरकार सुस्तच! छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली. राज्यातील आरोग्य व्यवस्थाच व्हेंटीलेटरवर असल्याचं यामुळे सिद्ध झालं असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. अशात आता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत १० रुग्ण दगावल्याची घटना समोर आली आहे. तसंच आता हा आकडा १८ वर पोहचला आहे. शासनाकडून मात्र यावर स्पष्टीकरण देताना औषधांच्या तुटवड्यामुळे किंवा डॉक्टरांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाले नसल्याचा दावा केला आहे. मृत पावलेले रुग्ण हे बाहेरून रेफर केलेले किंवा मरणासन्न अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते, अशी माहिती रुग्णालयाचे डीन संजय राठोड यांनी दिली आहे.

काय म्हणाले डीन संजय राठोड?

छत्रपती संभाजीनगर शासकीय घाटी रुग्णालयाचे डीन संजय राठोड यांनी घाटीत गेल्या २४ तासांत झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूवर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, घाटी रुग्णालयात रोज १० ते १२ मृत्यू होत असतात. त्यामुळे या रुग्णालयात महिन्याकाठी सरासरी ३०० रुग्ण दगावतात. या रुग्णांमध्ये बाहेरुन खासगी रुग्णालयात रेफर केलेले व उशिरा दाखल केलेले रुग्ण अधिक असतात. तर, औषध तुटवडा आणि डॉक्टर कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नाही, असं राठोड यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी केलं ट्वीट....

छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात घडलेल्या प्रकारावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,

"नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस होत नाही, तितक्यात औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात २ नवजात बालकांसह ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. कालची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही, अतिशय दुर्देवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली...." असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in