
शिवसेनेच्या बंडखोर गटाला सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. या पत्राला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात उत्तर दिले. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज ठाकरेंनी खूप सुंदर पत्र लिहिले आहे. मी त्यांची भेट घेणार असल्याचेही नमूद केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राज ठाकरेंनी खूप सुंदर पत्र लिहिले आहे. खरं तर मी दुसऱ्या दिवशी त्यांना उत्तर देण्याचा विचार केला होता, पण तसे शब्द मला सुचले नाही, मग मी त्यांना फोन करून आभार मानले. राज ठाकरेंची प्रकृती अजूनही बरी नाही. नुकतच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, ते घरी आहेत. पण मी त्यांना लवकरच भेटणार आहे.
शिवाय शरद पवार यांनी ही मोठ्या मनाने माझे कौतुक केले त्यामुळे मी त्यांचा देखील आभारी आहे. मला संघाचा स्वयंसेवक असे बोलणे आनंदी करणारे आहे, असेही फडणवीस म्हणाले.
आपण सर्व राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाही.
"महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा मी म्हणत होतो की, हे सरकार चालणार नाही. त्यावेळी माझ्यावर कविता करण्यात आल्या, की मी पुन्हा येईन. यावर अनेकांनी टोला लगावला. पण मी येऊन त्यांनाही आणले.