यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बनावट पदवीचा भांडाफोड

राज्यातील २० विद्यार्थ्यांच्या पदव्या बोगस
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बनावट पदवीचा भांडाफोड
Published on

नाशिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बनावट पदव्यांचे प्रकरण समोर आले आहे. बीएससी एमएलटी आणि डीएमएलटी या लॅब टेक्निशियनच्या २० विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदव्या बोगस असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पॅरावैद्यक परिषदेकडे बनावट पदव्यांची कागदपत्रे सादर केल्यानंतर पडताळणीअंती राज्यातील २० विद्यार्थ्यांना बोगस पदव्यांमुळे कायदेशीर नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

विविध आजारांचे निदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बीएससी एमएलटी आणि डीएमएलटी या लॅब टेक्निशियनच्या बनावट पदव्या दिल्याप्रकरणी राज्यातील चार संशयितांवर नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गौरव अनिलकुमार शिरसकर (नागपूर), रमेश होनामोरे (सातारा), अशोक ज्ञानदेव सोनवणे (अहमदनगर) आणि संजय गोविंद नायर (नांदगाव) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा कक्षाचे उपकुलसचिव मनोज नारायण घंटे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. “२०२० मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याच्या परवानगीसाठी महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे अर्ज केले होते. त्यातील २० अर्जधारकांच्या पदव्या बनावट असल्याचे समोर आले आहे. पदवी आणि पदविका गुणपत्रकासह कागदपत्रांची पडताळणी केल्यावर त्यात संशय आल्याने विद्यापीठाकडे खातरजमा केली असता, सदर विद्यार्थ्यांची विद्यापीठात नोंदणीच नसल्याची बाब उघड झाली. पॅरावैद्यक परिषदेने केलेल्या सूचनेच्या आधारे विद्यापीठाने या प्रकरणाचा संपूर्ण तपास केल्यावर विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत. त्यातील १३ जणांनी संशयिताकडून पदवी घेतल्याचे कबुल केले असून एकाने कुणाचाही उल्लेख केलेला नाही. उर्वरित सहा जणांनी अद्याप कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in